चार नगरपालिकांना नव्या नगराध्यक्षांचे वेध

By Admin | Updated: May 29, 2014 23:54 IST2014-05-29T23:54:08+5:302014-05-29T23:54:08+5:30

जिल्ह्यातील चार नगर पालिकांमधील नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपायला आल्याने या ठिकाणी राजकीय हालचाली वाढल्या आहेत. जिल्ह्यातील सहा नगर पालिकांपैकी वरोरा, बल्लारपूर,

Four municipal councils watched new mayor | चार नगरपालिकांना नव्या नगराध्यक्षांचे वेध

चार नगरपालिकांना नव्या नगराध्यक्षांचे वेध

बल्लारपूर, मूलमध्ये ओढाताण : दावेदार वाढल्याने वरोर्‍यात अस्थिरता
गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूर
जिल्ह्यातील चार नगर पालिकांमधील नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपायला आल्याने या ठिकाणी राजकीय हालचाली वाढल्या आहेत. जिल्ह्यातील सहा नगर पालिकांपैकी वरोरा, बल्लारपूर, मूल आणि राजुरा या ठिकाणच्या नगरपालिकांना नव्या नगराध्यक्षांचे वेध लागले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या निवडणुकांना महत्व आले आहे. संख्याबळात रस्सीखेच असलेल्या नगरपालिकांमध्ये आतापासूनच गटातटांचे राजकारण सुरू झाल्याने स्थानिक गटनेत्यांची डोकेदुखी वाढायला लागली आहे. या चार ठिकाणी राजुरा वगळता वरोरा, मूल आणि बल्लारपूर या तिन्ही ठिकाणी रस्सीखेच दिसत आहे. वरोर्‍यामध्ये काँग्रेसमध्ये दावेदार अधिक आहेत. त्यांच्यात अद्यापही एकमत झालेले नसल्याने तिथे पालकमंत्र्यांची डोकेदुखी वाढली आहे. या सोबतच अपक्षांवर डोळा ठेवून राष्ट्रवादी आघाडीने हालचाली सुरू केल्याने नगरसेवकांना सांभाळणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.
बल्लारपुरात काँग्रेसच्या बाबू-भाऊमध्येच रस्सीखेच
३२ सदस्यसंख्या असलेल्या बल्लारपूर नगरपालिकेमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसचे नेते नरेश पुगलिया यांच्या गटाच्या ताब्यात ही नगरपालिका असून येथे रजनीताई मुलचंदानी नगराध्यक्ष आहेत. येथील नगराध्यक्षपद महिला एसटी प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. विशेष म्हणजे या नगरपालिकेत एसटी प्रवर्गातील दोनच महिला असून त्यापैकी छाया मडावी या काँग्रेसच्या तर, मिना मडावी या अपक्ष नगरसेविका आहेत. संख्याबळ लक्षात घेता येथील नगराध्यक्षपद काँग्रेसकडे राहायला हरकत नाही. मात्र पक्षातील अंतर्गत सत्तासंघर्ष येथे उफाळण्याची शक्यता आहे. पुगलिया यांच्या गटाकडून छाया मडावी यांचे नाव पुढे येत असतानाच आमदार विजय वडेट्टीवार गटानेही येथे राजकीय हालचाली सुरूगेल्या आहेत.  त्यांच्याकडून मिना मडावी यांचे नाव पुढे येत असल्याने येथे काँग्रेसमध्येच लढत होण्याची शक्यता आहे. भाजपाकडे या प्रवर्गातील उमेदवारच नाही. त्यांनी अद्याप आपले पत्ते उघडे केले नसले तरी पुगलिया गटाला शह देण्यासाठी मिना मडावी यांना भाजपा मदत करू शकते. त्या बदल्यात भाजपा उपाध्यक्षपद पदरात पाडू शकते.
दावेदारी वाढल्याने वरोर्‍यात अस्थिरता
पालकमंत्री संजय देवतळे यांचे वर्चस्व असलेल्या वरोरा नगर पालिकेमध्ये सध्या सत्ता काँंग्रेसची आहे. एससी प्रवर्गातील या पदावर देवतळे यांच्या गटाचे विलास टिपले हे नगरसेवक आहेत. त्यांचा कार्यकाळ ३0 जूनला संपणार असल्याने हालचालींना वेग आला आहे. खुल्या प्रवर्गातील महिला गटासाठी या वेळेचे नगराध्यक्षपद राखीव झाल्याने दावेदारी वाढली आहे. पद एक आणि दावेदार अनेक अशा स्थितीमुळे येथे अस्थिरतेचे वातावरण वाढले आहे. काँग्रेसकडून दिपाली किशोर टिपले, प्रतिमा जोगी आणि रंजना पुरी यांनी भक्कमपणे मोर्चेबांधणी चालविली आहे. आधी नावावर एकमत करा, नंतरच चर्चेला या, असे पालकमंत्री संजय देवतळे यांनी सांगूनही नावावर एकमत होता होईना. त्यामुळे राजकीय गोंधळात भर पडली आहे. अशातच राष्ट्रवादीनेही राकॉ आघाडीचा प्रयोग करून उमेदवारी दामटण्याचा प्रयत्न चालविला आहे. जनाबाई पिंपळशेंडे आणि राणी महाजन यांच्या नावांची या गटाकडून चर्चा आहे. अशातच १२-११ असे संख्याबळ असल्याने यावेळी नगराध्यक्षपदाची निवड चुरशीची होण्याची शक्यता अधिक आहे. या सर्व घटनाक्रमात अपक्ष नगरसेवकाचा कल महत्वाचा ठरणार, असे स्पष्ट संकेत आहेत.
 

Web Title: Four municipal councils watched new mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.