मोटेगाव येथील आगीत चार घरे जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:29 IST2021-04-01T04:29:11+5:302021-04-01T04:29:11+5:30
पळसगाव (पिपर्डा) : चिमूर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या मोटेगाव येथे बुधवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीमध्ये मोटेगाव ...

मोटेगाव येथील आगीत चार घरे जळून खाक
पळसगाव (पिपर्डा) : चिमूर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या मोटेगाव येथे बुधवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीमध्ये मोटेगाव येथील चार घरे जळून खाक झाली. आगीचे रौद्ररूप पाहून संपूर्ण गावच आगीच्या भक्ष्यस्थानी पडेल असे वाटत होते. मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे तसे झाले नाही. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मोटेगाव येथे दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक आग आग म्हणून गावात एकच कल्लोळ माजला. आधी दोन नंतर चार घरे पेटायला लागली. यात प्रकाश नेवारे, मंगेश नेवारे, सुधाकर शेंडे, राजू अडसोडे यांच्या घराला आग लागली होती. काही कळायच्या आत वाऱ्याच्या वेगाने आगीने संपूर्ण घराची राखरांगोळी केली. गावातील विलास कोराम यांनी चिमूर येथील अग्निशमन दलाला माहिती दिली. तात्काळ अग्निशमन दल दाखल झाले. गावकरी आणि अग्निशमन दल यांनी आग आटोक्यात आणली. आग बंडू न्हाने यांच्या घरालाही लागली होती. परंतु थोडक्यात बचावली. त्यांचे पाण्याचे पाईप जळून खाक झाले. या आगीत चार घरे जळून खाक झाली. लाखो रुपयांचे नुकसान झाले.
या आगीची माहिती होताच उपविभागीय अधिकारी संकपाळ, तहसीलदार नागटिळक, संवर्ग विकास अधिकारी पुरी, पोलीस निरीक्षक शिंदे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. आगीत नुकसानग्रस्त घराची पाहणी करून तात्काळ पंचनामा करून मदत देण्याचे आश्वासन दिले.
बॉक्स
वणव्यामुळे लागली असावी आग
शेतात वणवा लावला असता वाऱ्याच्या वेगाने वणव्याची आग गावाकडे आली व घराला लागली असावी, असा अंदाज काही गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. परंतु आग कुणी लावली, हे अद्याप कळू शकलेले नाही. पोलिसांनी अज्ञात इसमावर मर्ग दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.