अंतरगाव येथे चार घरे जळाली
By Admin | Updated: March 23, 2017 00:33 IST2017-03-23T00:33:47+5:302017-03-23T00:33:47+5:30
सिंदेवाही तालुक्यातील अंतरगाव येथे चार शेतकऱ्यांची घरे जळून खाक झाल्याची घटना बुधवारी सकाळी सात ते आठ वाजताच्या सुमारास घडली.

अंतरगाव येथे चार घरे जळाली
चार लाखांचे नुकसान : धान, जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्य जळून खाक
नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील अंतरगाव येथे चार शेतकऱ्यांची घरे जळून खाक झाल्याची घटना बुधवारी सकाळी सात ते आठ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत अंदाजे चार लाखांचे नुकसान झाले आहे.
अंतरगाव येथील शेतकरी कृष्णा देवाजी नागापूरे, बळीराम रामाजी नागापूरे, काशीनाथ रामाजी नागापूरे, रघुनाथ रामाजी नागापूरे यांची घरे लागून असून अचानक घराला आग लागली. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने शार्ट सर्किट झाल्याने अडचणी निर्माण झाल्या. काही नागरिकांनी गावातील विद्युत बंद केली आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र घराच्या वरच्या मजल्यावर बैलांचा चारा म्हणून कुटार भरलेले होते आणि दुसऱ्या बकारीमध्ये धान भरलेले होते. कुटाराने पेट घेतल्याने घराचे लाकुड फाटे पुर्णत: जळाले.
आग विझविण्यासाठी मूल येथून अग्नीशमन दलाची गाडी बोलविण्यात आली आणि ११ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगतीत मोटार पंपाचे पाईप बचावले आणि धान्य अर्धवट जळाले तर उर्वरीत धान्य पाण्यामुळे खराब झाले. या घटनेत कृष्णा नागापूरे यांचे ३६ हजार रुपये, बळीराम नागापूरे यांचे दोन लाख १२ हजार रुपये, काशीनाथ नागापूरे ७० हजार तर रघुनाथ नागापूरे यांचे ७६ हजार रुपये असे एकूण तीन लाख ९५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले.
घटनास्थळाला जि. प. सदस्य रमाकांत लोधे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र बोरकर, तहसीलदार भास्कर बांबोळे, नायब तहसीलदार रामचंद्र नैताम, मंडळ अधिकारी एस.जी. कन्नाके, तलाठी वाय.जे. सहारे, पोलीस पाटील सचिन शेंडे, सरपंच दुशीला बारसागडे व पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. शार्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. (वार्ताहर)