लुटारूंना चार दिवसांची पोलीस कोठडी
By Admin | Updated: February 6, 2016 00:51 IST2016-02-06T00:51:22+5:302016-02-06T00:51:22+5:30
व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्याजवळील रोख आठ लाख रुपये व १ लाख ८० हजार रुपये किंमतीचे सोने लुटारूंनी लंपास केले होते.

लुटारूंना चार दिवसांची पोलीस कोठडी
व्यापाऱ्यांना लुटण्याचे प्रकरण : आणखी काही घटना उजेडात येण्याची शक्यता
चंद्रपूर: व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्याजवळील रोख आठ लाख रुपये व १ लाख ८० हजार रुपये किंमतीचे सोने लुटारूंनी लंपास केले होते. या प्रकरणाची शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने चौकशी करून टोळीतील सहा जणांना जेरबंद केले. आरोपींना न्यायालयापुढे उभे केले असता, त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरात सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असतानाच २५ जानेवारी रोजी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते बिनबा या मार्गावर लुटारूंनी जाकीर हुसेन मकबुल हुसेन नामक व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्याजवळी रोख आठ लाख रुपये व १ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोने लंपास केले होते. या घटनेने पोलीस यंत्रणाही हादरून गेली होती. कुठलाही पुरावा नसल्याने या प्रकरणाच्या तपासाचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे होते. मात्र डी.बी. पथकाने अखेर लुटारूंचा मागमूस लावला.
या लुटारूंजवळून लुटमारीतील आणखी काही रक्कम जप्त करायची आहे. त्या रकमेचा कुठे विनियोग केला, याचा तपास पोलीस करीत आहेत. फईम अबरार शेख (२४), शाहरूख अली अहमद अली (१८), शेख अजहर शेख मेहराज (२४), मेहबूब आलाम आकत खान (२२), सद्दाम हुसेन अफसर हुसेन व फरहान शेख शब्बीर शेख अशी आरोपींची नावे असून हे सर्वजण चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. (प्रतिनिधी)