‘त्या’ हत्येप्रकरणी चौघांना अटक
By Admin | Updated: December 6, 2014 01:22 IST2014-12-06T01:22:27+5:302014-12-06T01:22:27+5:30
तेलंगाना सिमेलगत असलेल्या अमृतगुडा येथील नामदेव पांडू पेंदोर (१७) याचा शिकारीसाठी टाकलेल्या जिवंत वीज तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला.

‘त्या’ हत्येप्रकरणी चौघांना अटक
विरूर (स्टे.) : तेलंगाना सिमेलगत असलेल्या अमृतगुडा येथील नामदेव पांडू पेंदोर (१७) याचा शिकारीसाठी टाकलेल्या जिवंत वीज तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी तब्बल तीन महिन्यानंतर विरुर पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळावरील स्थिती व गुप्त माहितीच्या आधारे चार जणांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुधाकर वेट्टी, शकुनाथ रामसाव मेश्राम (२१), भोजु भीमा पेंदोर (३०), यादव सोमा पेंदोर (२०) रा. अमृतगुडा यांचा समावेश आहे.
राजुरा तालुक्यातील अमृतगुडा हे गाव जंगल शेजारी असल्याने येथे जंगली प्राण्यांचा वावर असते. याचा फायदा घेत येथील नागरिकांकडून जंगली प्राण्यांचे शिकार करण्याचे प्रकार वाढले आहे. याकडे मात्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत होते. घटनेच्या दुसऱ्या दिवशी २५ आॅगस्टला बडगा असल्याने पोळा आटोपून मृतक व त्यांचे सहकारी शिकार करण्याचा बेत आखला. शिकार करण्यासाठी निघाले असता नामदेव पेंदोर याला खर्ऱ्याचा व्यसन असल्याने ते काही वेळ पानटपरीवर थांबले.
मात्र त्याचे सहकारी हे जंगल शेजारी असलेल्या शेतशिवारात शिकारीसाठी वीज प्रवाह सुरु केला. नामदेव पेंदोर हे काही वेळाने गेल्याने आपले सहकारी वीज प्रवाह सुरु केला असेल, अशी कल्पना त्यांना नव्हती. ते वाटेने जात असताना त्याचा जिवंत वीज तारेला स्पर्श होऊन खाली कोसळले. ते वाचवा..वाचवा... असे सहकाऱ्यांना विनंती केली. मात्र सहकाऱ्यांना असे वाटत होते की, हा जिवंत राहिला तर आमचे नाव पोलिसांना सांगणार. हे प्रकरण आमच्या अंगाशी येईल. याहेतुने त्याला जीवे मारण्याचा सहकाऱ्यांनी बेत आखला.
प्रथम बरशीने त्याच्या पोटावर वार केले. तो बेशुद्ध झाल्यावर त्याला कुणीही ओळखणार नाही म्हणून त्याचे नाव असलेला हात तोडला. ज्या पायाला तारेचा स्पर्श झाला तो पायही तोडला. एवढेच नाही तर क्रृरतेचा कळस गाठुन सहकाऱ्यांनी मृतकाचा चेहरा विद्रूप केला. अंगावरचे सर्व कपडे काढुन दुरवर फेकुन दिले. अनोळखी इसमाचा रेल्वेने मृत्यू झाल्याचा देखावा करण्यासाठी त्याला रेल्वे लाईनच्या बाजुला टाकुन गावात तो मी नव्हेच म्हणून पसार झाले.
नामदेव पेंदोर हा पोळा सणाला रात्री ८ ते ९ वाजताच्या दरम्यान बाहेर जातो म्हणून घरून निघुन गेला. मात्र घरी परत आलाच नाही. दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या नामदेवचा शोध घेण्यासाठी वडिलांनी नातेवाईकांकडे विचारणा केली. तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनाही विचारपूस केली. मात्र त्याचा पत्ता लागला नाही. दरम्यान रेल्वेने अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती विरूर पोलिसांना मिळाली. तेव्हा विरूर पोलिसांनी मर्ग दाखल करून घटनेचा पंचनामा केला.
दुसऱ्या दिवशी गावात मृतदेह हा नामदेव पेंदोर यांचा असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात होते. तेव्हा वडील व मृतकाचा काका लक्ष्मण पेंदोर हे घटनास्थळाकडे गेले असता काही अंतरावर मृतकाचे कपडे आढळून आले. तेव्हा वडिलांनी विरूर पोलीस ठाण्यात मृतदेह हा माझा मुलाचा आहे व त्याची हत्या करण्यात आली, असा संशय व्यक्त केला.
तेव्हा पोलिसांनी सुधाकर वेट्टी व परशुराम वेट्टी यांना ताब्यात घेऊन काही वेळाने सोडून दिले. मात्र तीन महिन्यानंतर विरूर पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळावरील स्थिती व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आणखी चार आरोपींना यांना अटक करून न्यायालयात हजर केले. (वार्ताहर)