महिन्याला साडेचार सिटी स्कॅन, शासकीय दर नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:27 IST2021-04-18T04:27:01+5:302021-04-18T04:27:01+5:30
आजाराच्या निदानासाठी सिटी स्कॅनची गरज पडते. रुग्णांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी राज्य सरकारने कोरोना रुग्णांसाठी खासगी केंद्रांमध्ये सिटी ...

महिन्याला साडेचार सिटी स्कॅन, शासकीय दर नावालाच
आजाराच्या निदानासाठी सिटी स्कॅनची गरज पडते. रुग्णांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी राज्य सरकारने कोरोना रुग्णांसाठी खासगी केंद्रांमध्ये सिटी स्कॅनचा दर स्लाईसनुसार निश्चित करून दिला आहे. खासगी हॉस्पिटल्सनी दोन हजार ते तीन हजारदरम्यान किमती आकाराव्यात. मात्र, यापेक्षा जास्त दर आकारू नये, असे निर्देश देण्यात आले. पण, चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील काही खासगी केंद्रे ३५०० ते ४००० रुपये शुल्क वसूल करीत आहेत, असा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे.
खासगी केंद्रातील कोरोना रुग्णांना सीटी स्कॅन आणि इतर तपासण्यासाठी जादा दर मोजावे लागत आहेत. खासगी कोविड हॉस्पिटलमधील देयकांची जशी जिल्हास्तरीय समितीने पडताळणी केली, त्याचप्रमाणे सिटी स्कॅन केंद्रांवरही पडताळणी करावी, अशी मागणी रुग्णांच्या कुटुंबीयांनी केली आहे. दोन हजार ५०० ते दोन हजार ८०० रुपये शासकीय दर असलेल्या सिटी स्कॅनसाठी तीन हजार ते ३२०० रुपये घेतल्या जात असल्याचे रुग्णांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
तपासणी समिती
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक झाला. शासकीय रुग्णालयात आता बेड्स शिल्लक नाहीत. त्यामुळे उपचाराविना रुग्णांचे हाल सुरू आहेत. अशा महामारीच्या काळात कोरोनाबाधित रुग्ण आणि नातेवाइकांना तपासण्यांसाठी अतिरिक्त शुल्क मोजावे लागत आहे. सीटी स्कॅन व विविध तपासण्यांमुळे आर्थिक ताण निर्माण झाला. तपासणी समितीने कोरोना काळात तरी सक्रिय व्हावे, अशी मागणी रुग्णांच्या कुटुंबीयांनी केली.
असे आहेत शासकीय दर
१६ स्लाईसखालील सीटी स्कॅन २००० रुपये
१६ ते ६४ स्लाईस सिटी स्कॅन २५०० रुपये
६४ पेक्षा अधिक स्लाईस सिटी स्कॅन ३००० रुपये
कोविड १९ साथरोगाच्या निर्मूलनासाठी सर्वच डॉक्टर प्रयत्नरत आहेत. रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा रात्रंदिवस काम करीत आहे. शासकीय दरानुसार सर्व शुल्क आकारले जावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. डॉक्टरांनी अतिरिक्त शुल्क आकारू नये, पावती देत नसतील तर संबंधितांनी प्रशासनाकडे तक्रार करावी. या तक्रारीनुसार पडताळणी करून दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल.
-डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर
डॉक्टरांनी सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिल्यानंतर सीटी स्कॅन केले. सीटी स्कॅनचे शासकीय दर किती आहेत, याबाबत माहिती नाही. सीटी स्कॅन केंद्रातही शासकीय दराचा फलक लावल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे अतिरिक्त पैसे घेणे सुरू आहे. तपासणी केंद्रात शासकीय दरपत्रक दर्शनी भागात लावावे.
- श्रीधर केळापुरे, रुग्णाचे नातेवाईक, विठ्ठल मंदिर वाॅर्ड, चंद्रपूर
कोट
चंद्रपुरात कोरोना संसर्ग वाढतच आहे. दोन दिवसांपासून सर्दी झाल्याने डॉक्टरांना दाखविले. त्यांच्या सल्लानुसार सीटी स्कॅन व अन्य तपासण्या केल्या. सिटी स्कॅनसाठी शासनाने दर ठरवून दिले, याची मला माहिती नाही. हे दर निश्चित असतील तर डॉक्टरांनी आदेशाचे पालन केलेच पाहिजे.
- प्रशांत कानस्कर, बालाजी वाॅर्ड, चंद्रपूर