चंद्रपुरात ‘दामिनी’ पथकाची स्थापना

By Admin | Updated: March 4, 2016 01:02 IST2016-03-04T01:02:38+5:302016-03-04T01:02:38+5:30

महिलांवरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या पुढाकारातून ...

Founding of 'Damini' Squad at Chandrapur | चंद्रपुरात ‘दामिनी’ पथकाची स्थापना

चंद्रपुरात ‘दामिनी’ पथकाची स्थापना

सशस्त्र कर्मचाऱ्यांचा सहभाग : रोडरोमियोंच्या कारवायांवर चाप लावणार
चंद्रपूर : महिलांवरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या पुढाकारातून चंद्रपुरात महिलांचे संरक्षण करण्यासाठी ‘दामिनी’ पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक आता रोडरोमियोंच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. सार्वजनिक ठिकाणी तरूणींची छेड काढणाऱ्या टारगटांविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
शुक्रवारपासून हे पथक शहरात कार्यरत होणार असून त्यामुळे आता महिला-तरूणींची छेड काढणाऱ्यांना सावध रहावे लागणार आहे. शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थीनी तसेच शहरातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पथक कार्यरत राहणार आहे. महिलांवरील वाढते अत्याचार थांबविण्याचे काम हे पथक कार्यरत राहणार आहे. अत्याचार व तशा पद्धतीच्या गुन्ह्यांवर आळा घालणे, एखादी युवती वा महिला अडचणीत असेल तर तिला मदत पुरविणे आदी जबाबदार या पथकावर टाकण्यात आली आहे.
या पथकात दोन दुचाकी वाहने राहणार आहेत. त्या दुचांकीवर प्रत्येकी दोन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच एक चारचाकी बोलेरो वाहनदेखील या पथकात राहणार असून त्यात एक महिला पोलीस अधिकारी, दोन महिला पोलीस कर्मचारी व दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक सशस्त्र राहणार असून या पथकाला अत्याधुनिक कॅमेरा पुरविण्यात आला आहे.
हे पथक चंद्रपूर शहरातील विविध शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, उद्याने तसेच उद्यानाच्या ठिकाणी २४ तास गस्त घालणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Founding of 'Damini' Squad at Chandrapur