चारगाव खदान-माजरी मार्गावरील कोंढा पुलाची दैनावस्था
By Admin | Updated: May 16, 2017 00:34 IST2017-05-16T00:34:10+5:302017-05-16T00:34:10+5:30
कमीत कमी वाहतूक व जाण्या- येण्यासाठी असलेले कमी अंतर सुलभ होईल म्हणून माजरी- भद्रावती व परिसरातील नागरिकांनी पसंती दिलेल्या ...

चारगाव खदान-माजरी मार्गावरील कोंढा पुलाची दैनावस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
चारगाव: कमीत कमी वाहतूक व जाण्या- येण्यासाठी असलेले कमी अंतर सुलभ होईल म्हणून माजरी- भद्रावती व परिसरातील नागरिकांनी पसंती दिलेल्या चारगाव खदान ने माजरी मार्गावरील कोंढा पुलाची निर्मिती करण्यात आली. मात्र या पुलाची आता अत्यंत दयनीय अवस्था झाली असून तो पूल अखेरच्या घटका मोजत आहे. याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने रोष व्यक्त होत आहे.
भद्रावती- माजरी कोंढा मार्गे १५ ते १६ किलोमीटरचे अंतर आहे. मात्र या मार्गावर एम्टा खाणीची कोल सायडींग असल्याने सतत चालणारे व्हॉल्वो ट्रक, त्यामुळे उडणारी धूर व रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था, यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडत आहे. यामुळे म्भद्रावती- माजरी या मार्गाने जाणारे नागरिक या मार्गाचा दुसरा पर्याय म्हणून भद्रावती- देऊळवाडा-माजरी या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत.
एकतर या मार्गाने जाण्यास जवळपास ९० किलोमीटरचे अंतर कमी होते. यामुळे या मार्गाचा वापर वाढला आहे. मात्र या मार्गावर देऊळवाडा - माजरीच्या मध्यंतरी कोंढा पूल आहे. उल्लेखनीय असे की काही वर्षापूर्वी या ठिकाणी पुल नव्हता. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांच्या मागणीनंतर या नाल्यावर पूल बांधून दिला. मात्र, त्या नाल्यावरील पूर्वीच्या स्लॅबचे मोठे तुकडे व नाल्यात असणारे मोठमोठे दगड पडले आहेत. यातच रस्ता उंच आणि पुलाची उंची कमी, यामुळे थोड्या प्रमाणात पाऊस आला तरी पुलावरुन पाणी वाहू लागते व मार्गावरील वाहतूक ठप्प पडते. परिणामी सदर नाल्यावरील पुलाची उंची वाढविणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यातच या मार्गावर डांबरीकरण काही वर्षापूर्वी करण्यात आले होते. मात्र ते डांबरीकरण हळूहळू निघू लागले आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या मधोमध अनेक एक फूट रुंद व सात- आठ मीटर लांबीपर्यंतच्या भेगा पडलेल्या आहेत. या मार्गावरुन भद्रावतीवरुन माजरी वा वणीला जाणारे नागरिक, खाण कर्मचारी, शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जाणे-येणे करतात. हा मार्ग लवकरात लवकर दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अन्यथा हा मार्ग अपघातग्रस्त मार्ग म्हणून कुप्रसिध्द झाल्याशिवाय राहणार नाही.