निर्वाह भत्त्यासाठी वन कामगार उतरणार रस्त्यावर

By Admin | Updated: June 3, 2017 00:36 IST2017-06-03T00:36:11+5:302017-06-03T00:36:11+5:30

वन विकास महामंडळ वन विभाग तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कामगारांचा मेळावा विठ्ठल पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

Forest workers will go for the maintenance allowance on the road | निर्वाह भत्त्यासाठी वन कामगार उतरणार रस्त्यावर

निर्वाह भत्त्यासाठी वन कामगार उतरणार रस्त्यावर

बैठकीत निर्णय : शासनाने दखल घेण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वन विकास महामंडळ वन विभाग तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कामगारांचा मेळावा विठ्ठल पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. दहीवडे उपस्थित होते. यावेळी वन कामगारांच्या निर्वाह भत्त्यासाठी आंदोलन करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.
प्रास्ताविकातून बाबाराव मून यांनी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत १३ संरक्षण कुटी तसेच ७ तपासणी नाके आहेत. तसेच मोहर्ली मध्ये चार संरक्षण कुटी व चार गेट आहेत. कोळसा रेंज अंतर्गत ६ संरक्षण कुटी व चार गेट आहेत. अवैध जंगल तोड रोखणे, वन्य प्राण्यांची बेकायदेशिर शिकारीला आवर घालणे, वनामध्ये वनवा लागला तर तो विझविणे, तसेच वनरक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पायदळ गस्त करण्यासाठी संरक्षणकुटी कामगारांना कामावर लावले जाते. दिवसभर काम केल्यानंतर रात्र देखील संरक्षण कुटीवरच काढावी लागते. त्यामुळे गुलामाप्रमाणे कामगारांना राबविल्या जाते.
साप्ताहीक सुट्टी देखील दिल्या जात नाही. कामगार कायद्यानुसार आठ तासाचे काम संरक्षण कुटीवरील कामगाराकडून करुन घेण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. प्रा. दहीवडे यांनी, वनविभागात नव्याने ठेकापद्धतीचे आगमन झाले आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कामगारांच्या वेतनातून मासीक ५०० रुपयाची कपात तर मध्य चांदा वन विभाग अंतर्गत काम करणाऱ्या जिवती तथा राजुरा रेंज मधील कामगारांच्या वेतनातून ठेकेदाराच्या कमीशनच्या नावाखाली मासिक ९०० रुपयांची कपात करण्यात आली. ती कपात तत्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी मेळाव्यात करण्यात आली.
शरद मडावी यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी शामराव नेवारे, सायमन उंबरकर, नोगेंद्र पडोळे, शत्रुघ्न रायपूरे, रत्नापूर मोटघरे, गजानन बोटरे, रुपेश चनकापुरे यांनी मेळाव्यासाठी परिश्रम घेतले.

१६ जूनच्या धरणे आंदोलनात सहभागी व्हा !
वन कामगारांनी वेळोवेळी मागणी करुनही निर्वाह भत्याची थकबाकी देण्यात आली नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवर पत्र व्यवहार करूनसुद्धा पत्राला केराची टोपली दाखविल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे १६ जूनला वनविकास महामंडळ अंतर्गत वनविभागात काम करणाऱ्या वन कामगारांचा तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत काम करणाऱ्या कामगारांचा धरणे कार्यक्रम १६ जूनला आयोजित करण्यात आला आहे. आपल्या या न्याय मागणीला घेऊन होणाऱ्या धरणे कार्यक्रमात दुपारी १२ वाजता मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. दहीवडे यांनी केले.

Web Title: Forest workers will go for the maintenance allowance on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.