वरोरा शहरानजीकच्या जंगलाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:27 IST2021-04-10T04:27:43+5:302021-04-10T04:27:43+5:30
फोटो वरोरा : चिमूर रोड लगतच्या आनंदवन परिसरातील वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या राखीव जंगलाला शुक्रवारी सकाळी आग लागली. आगीमध्ये ...

वरोरा शहरानजीकच्या जंगलाला आग
फोटो
वरोरा : चिमूर रोड लगतच्या आनंदवन परिसरातील वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या राखीव जंगलाला शुक्रवारी सकाळी आग लागली. आगीमध्ये झाडे जळाली असून मागील काही वर्षात लावलेल्या रोपवनांनाही आगीची झळ बसली असून अनेक रोपटे जळाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.
वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या आनंदवन नजीकच्या ६२- २ या सर्वे क्रमांकामध्ये आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास आग लागली. आगीची तीव्रता मोठी असल्याने आग पसरत गेली. आगीमध्ये मोठे वृक्ष सापडल्याने त्यांना झळ सोसावी लागली. याच परिसरात वनविभागाच्या वतीने काटेरी तारेचे कुंपण काही वर्षांपूर्वी करण्यात आले. त्यामध्ये रोपे लावण्यात आली. त्यांनाही त्याचा फटका बसला. आग लागल्याचे लक्षात येताच घटनास्थळ नजीकच्या इंदिरा नगरमधील अमिनेश रेड्डी, प्रज्वल जीवणे, सोमेश्वर केंदुर, विकी आत्राम, तसेच आपचे विशाल मोरे, विशाल बोरकर, पंकज खाजवणे, राहुल बागडे, विराम करंबे, वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. काही दिवसांपूर्वी वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या बांद्रा गावाच्या शिवारातील जंगलाला आग लागल्याची घटना घडली होती. यामध्ये तीन वर्षापूर्वी लावण्यात आलेले रोपांना आगीची झळ पोहचली. मागील वर्षी सालोरी गावानजीकच्या रोपवाटिकेत आग लागल्याची घटना घडली होती, हे विशेष.
कोट
आज लागलेल्या आगीमध्ये रोपवाटिकेत फायर लाईन असल्यामुळे नुकसान झाले नाही. शॉर्ट सर्किटने आग लागण्याची शक्यता आहे.
-एम.पी. राठोड वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा.