२०७ मचानींसाठी वन विभागाकडे २५४ अर्ज प्राप्त
By Admin | Updated: May 20, 2016 01:06 IST2016-05-20T01:06:34+5:302016-05-20T01:06:34+5:30
येत्या २१ व २२ मे रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर, कोर क्षेत्रात पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांची गणना केली जाणार आहे.

२०७ मचानींसाठी वन विभागाकडे २५४ अर्ज प्राप्त
२१ व २२ मे रोजी प्राणीगणना : लख्ख चंद्रप्रकाशात ताडोबात गणना
चंद्रपूर : येत्या २१ व २२ मे रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर, कोर क्षेत्रात पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांची गणना केली जाणार आहे. चंद्राच्या लख्ख प्रकाशात होणाऱ्या या प्राणी गणनेसाठी २५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातून ४५६ प्रगणकांची निवड वनविभागाने केली आहे.
दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्राणी गणना केली जाते. यंदा २१ आणि २२ मे रोजी ताडोबातील कोर आणि बफर क्षेत्रातील पाणवठ्यावर वन्यप्राण्यांचे अस्तित्व संनियंत्रण कार्यक्रम राबविला जाणार आहे. प्राणी गणनेच्या अनुषंगाने अर्ज मागविण्यात आले होते.
प्राणी गणनेसाठी कोर भागात ६८, तर बफर क्षेत्रात १३९ मचानी उभारण्यात येणार आहेत.
मचानीवर प्राणी गणनेसाठी २५४ अर्ज प्राप्त झाले होते. यातील ४५६ प्रगणक प्राप्त ठरले आहेत. बफर विभागात लोखंडी मचान, निरीक्षण मानोरा व स्थानिक कर्मचाऱ्यांमार्फत लाकडी मचानी तयार करण्यात आल्या आहेत. मचानीवर एक क्षेत्रीय कर्मचारी आणि दोन प्रगणक बसविण्यात येणार आहेत. प्रगणकांकरिता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत नियमावली तयार करण्यात आल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)