अतिक्रमित वनजमिनीवर चालला वनविभागाचा बुलडोजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:01 IST2020-07-03T05:00:00+5:302020-07-03T05:01:03+5:30

चिमूर तालुक्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी शेकडो वर्षांपासून राहत असलेला आदिवासी बांधव अतिक्रमित वनजमीन कसून कुंटुबाचा उदरनिर्वाह करीत आहे. शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी वनजमिनीवर धान, सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांची लागवड केली आहे. मात्र वनविभागाने मदनापूर, तुकूम येथील अतिक्रमित आदिवासी शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता वनजमिनीवर २९ जूनला बुलडोजर चालविला.

Forest department bulldozer walked on the encroached forest land | अतिक्रमित वनजमिनीवर चालला वनविभागाचा बुलडोजर

अतिक्रमित वनजमिनीवर चालला वनविभागाचा बुलडोजर

ठळक मुद्देशेतमालाचे नुकसान करून सपाटीकरण : आदिवासी शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मासळ बु : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या मदनापूर, तुकूम येथील बफर व कोर झोन क्षेत्रातील शेकडो आदिवासी शेतकरी बांधवाच्या वडिलोपार्जित अतिक्रमित वनजमिनी आहेत. वनविभागाने या शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता यापैकी फक्त ११ आदिवासी शेतकरी बांधवाच्या अतिक्रमित वनजमिनीवर बुलडोजर चालवून सपाटीकरण केले.
चिमूर तालुक्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी शेकडो वर्षांपासून राहत असलेला आदिवासी बांधव अतिक्रमित वनजमीन कसून कुंटुबाचा उदरनिर्वाह करीत आहे. शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी वनजमिनीवर धान, सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांची लागवड केली आहे. मात्र वनविभागाने मदनापूर, तुकूम येथील अतिक्रमित आदिवासी शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता वनजमिनीवर २९ जूनला बुलडोजर चालविला. त्यामुळे आदिवासी शेतकरऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आदिवासी जाती जमाती व इतर पारंपरिक वनहक्क अधिनियम २००६ व २००८ नुसार सदर अतिक्रमित जागेवर वनहक्क दावा जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे प्रलंबित आहे. वनविभागाने या जागेवर झाडे लावण्याच्या दृष्टीकोनातून खड्डे खोदून वनजमिनीचे सपाटीकरण केले आहे. या मोहिमेमुळे प्रत्येक आदिवासी शेतकऱ्यांचे अडीच लाख रुपये नुकसान झाले आहे. सदर अतिक्रमित वनजमिनीची मौका चौकशी करून नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी कैलास कूळमेथे, रूपचंद मडावी, शत्रुघ्न बगडे, पांडुरंग बावणे, वसंता नन्नावरे, पत्रु रंदये, प्रमोद पेंदाम, संजय भरडे, प्रल्हाद खाटे, सलेवान हाजेम, मनोहर जुमनाके यांनी उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांना निवेदन देऊन केली आहे. दरम्यान, सदर मोहीम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आल्याचे वनपाल एम.जे. मस्के यांनी सांगितले.

शेतकरी भयभीत
मासळ बु. परिसरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेल्या व पळसगाव बफर वन परिक्षेत्रालगत असलेल्या पिपर्डा, पळसगाव, गोंडमोहाळी, विहीरगाव, विहीरगाव तुकुम, मदनापूर, बामनगाव, कोलारा येथील शेतकरीदेखील जबरानजोत वनहक्कांच्या नियमानुसार वनजमिनीवर पिके घेतात. तिथेदेखील वनविभागाचा बुलडोजर चालू शकतो. त्यामुळे या परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहे.

Web Title: Forest department bulldozer walked on the encroached forest land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.