प्रवास भाडे सवलतीसाठी आता ‘आधार’ची सक्ती
By Admin | Updated: February 3, 2015 22:52 IST2015-02-03T22:52:10+5:302015-02-03T22:52:10+5:30
सर्व घटकांचा सर्वकष विकास व्हावा, याकरिता एसटी महामंडळद्वारे विविध प्रकारच्या प्रवास भाडे सवलत योजना प्रदान केल्या जातात. मात्र, अनधिकृतरीत्या तयार करण्यात आलेल्या

प्रवास भाडे सवलतीसाठी आता ‘आधार’ची सक्ती
एसटी महामंडळाचा पुढाकार : बोगस कार्डधारकांवर बसणार वचक
चंद्रपूर : सर्व घटकांचा सर्वकष विकास व्हावा, याकरिता एसटी महामंडळद्वारे विविध प्रकारच्या प्रवास भाडे सवलत योजना प्रदान केल्या जातात. मात्र, अनधिकृतरीत्या तयार करण्यात आलेल्या बोगस कार्डच्या माध्यमातून या योजनांचा लाभ घेतला जात असल्याने एसटी महामंडळाच्या तिजोरीवर ताण पडत आहे. यावर लगाम कसण्यासाठी एसटी महामंडळ सरसावले असून, प्रवास भाडे सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना यापुढे आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र दाखविणे बंधनकारक राहील. त्याची त्वरित अंमलबजावणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
समाजातील विविध सामाजिक घटकांना सामाजिक बांधीलकीच्या नात्याने एसटी महामंडळाद्वारे सुरुवातीच्या कालावधीपासून विविध प्रवास भाडे सवलत योजना प्रदान केल्या जातात. विशेषत: विविध विद्यार्थी वर्गास विविध कारणांसाठी प्रवास भाडे सवलत अनुद्देय करून साक्षरतेचे प्रमाण वाढवून राज्याच्या प्रगतीस हातभार लावला आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य सैनिक, दलितमित्र पुरस्कार्थी, आदिवासी सेवक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी आदींच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य करणाऱ्या पुरस्कारर्थीना विनामूल्य एसटी प्रवास सवलत प्रदान केली जाते.
वयाची ६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आणि अंध, अपंग व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींनादेखील एसटी प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. मात्र, जनसेवेचे हे कार्य एसटी महामंडळाच्या अंगलट येत असून, बनावट कार्ड तयार करून सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांचा सुळसुळाट झाला आहे. प्रवास भाड्यात सवलत मिळविण्यासाठी बनावट कार्ड दाखवून प्रवाशांकरवी एसटीला चुना लावला जात असल्याची हजारो प्रकरणे आढळून आली आहेत.
बनावट कार्डधारक प्रवाशांची कमतरता नाही. अंध, अपंग आणि ज्येष्ठ नागरिक सवलतींचे हजारो बनावट कार्ड आजतागायत जप्त करण्यात आलेत. यावर सरसकट लगाम हे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता बोगस कार्डधारकांवर वचक बसणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)