फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे आयुष्य काळवंडले
By Admin | Updated: March 6, 2015 01:14 IST2015-03-06T01:14:35+5:302015-03-06T01:14:35+5:30
तालुक्यातील थेरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चेक कोसंबी नं. १ (भिवकुंड चक) या गावात स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही शुद्ध पाण्याची व्यवस्था झालेली नाही.

फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे आयुष्य काळवंडले
नीळकंठ नैताम पोंभुर्णा
तालुक्यातील थेरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चेक कोसंबी नं. १ (भिवकुंड चक) या गावात स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही शुद्ध पाण्याची व्यवस्था झालेली नाही. गावकऱ्यांना फ्लोराईड युक्त पाणी पिऊन जगावे लागत असल्याने त्यांचे आयुष्यंच काळवंडले आहे. गावातील अनेक नागरिकांना कमरेचा आजार, दात व गुडघ्याचे आजार जडले आहेत. याकडे मात्र, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची खंत गावातील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केली.
पाणी म्हणजे जीवन, असे म्हटले जाते. मात्र याच पाण्यामुळे आता गावकऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. फ्लोराईडयुक्त पाणी प्राशनाने अख्ये गाव दुर्धर आजाराने ग्रस्त झाले आहे.
कुणी कमरेतून वाकले असून काहीना गुडघ्याचे विकार, दाताचे विकार तर कुणाला चालताना हात झटकणे आदी प्रकार या गावात दिसून येते.
पोंभुर्णा तालुक्यातील चेक कोसंबी नं. १ हे गाव तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर आहे. २०० ते ३०० लोकवस्तीचे हे गाव असून या ठिकाणी शंभर टक्के नागरिक दलित समाजाचे आहेत.
मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे येथील नागरिकांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. गावाची मुख्य समस्या म्हणजे फ्लोराईडयुक्त पाणी आणि आता हेच पाणी नागरिकांना मरणाऱ्या दाढेत ढकलत आहे. याकडे आरोग्य विभागाने वेळीच लक्ष देऊन गावातील शुद्ध पाण्याची समस्या सोडवण्याची मागणी नागरिकांची आहे.