हत्येचा प्रयत्न करणाऱ्याला पाच वर्षांचा कारावास
By Admin | Updated: October 23, 2016 01:06 IST2016-10-23T01:06:39+5:302016-10-23T01:06:39+5:30
जादुटोन्याच्या संशयावरून संतप्त होत सुरीने सपासप वार करून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

हत्येचा प्रयत्न करणाऱ्याला पाच वर्षांचा कारावास
न्यायालयाचा निकाल : जादुटोन्याच्या संशयावरून केली मारहाण
चंद्रपूर : जादुटोन्याच्या संशयावरून संतप्त होत सुरीने सपासप वार करून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश के.एल. व्यास यांनी हा निकाल दिला.
राजेश गंगाधर पेन्नूरवार (३८) रा. चितेगाव ता. मूल असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी हा सुध्दा चितेगाव येथीलच रहिवासी आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूल तालुक्यातील चितेगाव येथील फिर्यादी हे आपले जेवण आटोपून ग्रामपंचायत चौकात फिरायला गेले. यावेळी आरोपी राजेश गंगाधर पेन्नूरवार हा तिथे आला. त्याने अकारण फिर्यादीसोबत वाद घातला. त्यानंतर तू जादू शिकला आहेस, असे म्हणत जादुटोन्याच्या संशयावरून आरोपी राजेशने फिर्यादीवर सुरीने वार केले. यामुळे फिर्यादीच्या पोटावर व मानेवर गंभीर दुखापत झाली.
याबाबत फिर्यादीने मूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून मूल पोलिसांनी वैद्यकीय अहवाल घेऊन आरोपीला अटक केली. त्याच्याविरुध्द अपराध क्र. ६१/२०१३ च्या कलम ३२४, ३०७ नुसार गुन्हा दाखल केला. सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हरमळकर यांनी केला व आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने सदर प्रकरणात साक्षीदार तपासून योग्य पुराव्याच्या आधारे आरोपी राजेश पेन्नूरवार याला पाच वर्ष सक्त मजुरीचा शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला. सदर प्रकरणात सरकारतर्फे अॅड. महाजन यांनी युक्तीवाद केला. (शहर प्रतिनिधी)