एक लाख रुपये उडविणाऱ्या पाच महिलांना अटक
By Admin | Updated: March 12, 2016 01:15 IST2016-03-12T01:15:12+5:302016-03-12T01:15:12+5:30
येथील बसस्थानकावर एका महिला प्रवाशाजवळील एक लाख रुपयांची रक्कम लंपास करणाऱ्या नागपुरातील पाच महिलांना रामनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

एक लाख रुपये उडविणाऱ्या पाच महिलांना अटक
चंद्रपूर : येथील बसस्थानकावर एका महिला प्रवाशाजवळील एक लाख रुपयांची रक्कम लंपास करणाऱ्या नागपुरातील पाच महिलांना रामनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
१७ फेब्रुवारीला आष्टी (जि.गडचिरोली) येथील कांता अशोक गोखरे ही महिला चंद्रपुरच्या बसस्थानकावर घुग्घूस येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना तिच्याजवळील बॅगमधून एक लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीवरून रामनगर पोलीस आरोपींचा शोध घेत असतानाच शुक्रवारी दुपारी पाच संशयित महिला चंद्रपूरच्या बसस्थानकावर तान्हुल्या मुलांना घेऊन गर्दीमध्ये संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांना मिळाली. त्यांनी लगेच डी.बी. पथकासह बसस्थानकावर जाऊन त्या संशयित महिलांना लगेच ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी कांता गोखरे या महिलेच्या बॅगमधून एक लाख रुपये लंपास केल्याची कबुली दिली. या कारवाईत पोलिसांनी या महिलांजवळून एक लाख रुपयांपैकी २५ हजार २५० रुपयांची रक्कम जप्त केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक भाकडे, मुटेकर, जाधव आदींनी केली. (प्रतिनिधी)