रोजगार हमी योजनेच्या कामावर पाच हजार मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:27 IST2021-04-18T04:27:17+5:302021-04-18T04:27:17+5:30
३१ ग्रामपंचायत क्षेत्रात कामाला सुरुवात : कोरोनाकाळात मजुरांना मोठा दिलासा भोजराज गोवर्धन मूल : ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम ...

रोजगार हमी योजनेच्या कामावर पाच हजार मजूर
३१ ग्रामपंचायत क्षेत्रात कामाला सुरुवात : कोरोनाकाळात मजुरांना मोठा दिलासा
भोजराज गोवर्धन
मूल : ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी ग्रामपंचायतस्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मूल तालुक्यातील ३१ ग्रामपंचायत क्षेत्रांतील सुमारे पाच हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे, तर १९ ग्रामपंचायत क्षेत्रांतील कामाला काही दिवसात सुरुवात होणार आहे.
कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे कामाच्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. सोबतच सामाजिक अंतर ठेवूनच कामे सुरू आहेत.
प्रत्येक मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत मूल तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींपैकी ३१ ग्रामपंचायत अंतर्गत विविध कामाला सुरुवात करण्यात आली असून सुमारे पाच हजार मजुर काम करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचे सावट आहे, यामुळे अनेक बेरोजगार युवक रोजगारासाठी इतरत्र स्थलांतरित होत असताना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात झाल्याने मजूर समाधान व्यक्त करीत आहेत.
रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने तालुका कार्यक्रम अधिकारी तथा तहसीलदार डाॅ. रवींद्र होळी, सहा. तालुका कार्यक्रम अधिकारी तथा संवर्ग विकास अधिकारी मयुर कळसे, विस्तार अधिकारी (नरेगा) जीवन प्रधान, सहायक कार्यक्रम अधिकारी सतीश वनकर, प्रज्ञामित्र नगराळे प्रयत्नशील आहेत.
बॉक्स
अशी सुरू आहेत कामे
मूल पंचायत समितीअंतर्गत ग्रामपंचायतच्या वतीने तालुक्यात ८० कामे सुरू असून यामध्ये नाला खोलीकरण सहा, कालवा खोलीकरण तीन, बोडी खोलीकरण तीन, मामा तलाव दोन, मजगी नऊ, शेततलाव एक, गुरांचे गोठे तीन, वृक्षलागवड ३३, घरकुल २० अशी कामे सुरू आहेत. १६ एप्रिलपर्यंत चार हजार ९७० मजूर कामावर होते. तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून उर्वरित १९ ग्रामपंचायतींमध्येही लवकरच कामाला सुरुवात करावी, अशी अपेक्षा मजुरांनी व्यक्त केली आहे.