पाच हजार केशरी शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित
By Admin | Updated: November 4, 2016 01:18 IST2016-11-04T01:18:30+5:302016-11-04T01:18:30+5:30
महाराष्ट्र शासनाच्या अन्न पुरवठा विभागाने जानेवारी २०१५ पासून केशरी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य देणे बंद केले आहे.

पाच हजार केशरी शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित
सिंदेवाही : महाराष्ट्र शासनाच्या अन्न पुरवठा विभागाने जानेवारी २०१५ पासून केशरी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य देणे बंद केले आहे. त्यामुळे लाभार्थी नागरिकामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पूर्वी स्वस्त धान्य दुकानातून अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना दोन रुपये किलो दराने गहू व तीन रुपये दराने तांदूळ दरमहा ३० किलो, पिवळ्या शिधापत्रीका धारकांना तांदूळ व गहू मिळून दरमहा ३० किलो तर केशरी शिधापत्रीकाधारकांना तांदूळ १० किलो व गहू १० किलो मिळून २० किलो धान्य मिळत होते.
सद्यस्थितीत सिंदेवाही तालुक्यात सन २०१५ पासून अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना दोन रुपये दराने २० किलो गहू व तीन रुपये दराने १५ किलो तांदूर मिळून ३५ किलो धान्य वाटप केले जात आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थी अंतर्गत शिधापत्रिकेत समाविष्ट असलेल्या प्रत्येक व्यक्तीला पाच किलो धान्य यामध्ये तीन किलो तांदूळ व दोन किलो गव्हाचा समावेश आहे. तर केशरी शिधापत्रिकाधारकांना जानेवारी २०१५ पासून स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरण बंद करण्यात आले आहे. वास्तविक पाहता प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना २० किलो धान्य मिळावयास पाहिजे. सिंदेवाही तालुक्यात ९५ स्वस्त धान्य दुकाने आहेत. तसेच या तालुक्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांची संख्या ४८ हजार २९९ तर अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या ७ हजार ८३२ तर केशरी शिधापत्रिकाधारकांची संख्या पाच हजार ८५७ आहे. यामध्ये फक्त केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थी या योजनेपासून वंचित झाले आहेत. दिपावलीसारख्या सणामध्ये केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य मिळू नये, याबद्दल केशरी शिधापत्रिकाधारकामध्ये असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न पुरवठा विभागाने केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य पुरवठा करावा, अशी लाभार्थी शिधापत्रिकाधारकांची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)