कुष्ठरोगाचे पाच हजार ९८९ संशयित रुग्ण
By Admin | Updated: November 6, 2016 00:52 IST2016-11-06T00:52:09+5:302016-11-06T00:52:09+5:30
कुष्ठरोगावर आळा घालण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हाभरात कृष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली.

कुष्ठरोगाचे पाच हजार ९८९ संशयित रुग्ण
१७ लाख नागरिकांची तपासणी : सावली तालुक्यात सर्वाधिक ७०६ रुग्ण
परिमल डोहणे चंद्रपूर
कुष्ठरोगावर आळा घालण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हाभरात कृष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील चार लाख ५० हजार कुंटुबांना भेटी देऊन १७ लाख एक हजार ७६५ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्याभरात पाच हजार ९८९ कुष्ठरोगाचे संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी ३७३ रुग्णांना कुष्ठरोग असल्याचे निष्पन्न झाले. तर सर्वात जास्त ७०६ संशयित रुग्ण सावली तालक्यात आढळून आले. त्यापैकी ७२ लोकांना कुष्ठरोग असल्याचे निष्पन्न झाले. रुग्णावर आरोग्य विभागामार्फंत उपचार सुरु आहे.
केंद्र शासनाच्या आदेशानूसार जिल्हा आरोग्य विभागामार्फंत कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यामध्ये एका विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली. या पथकात आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, आशा वर्कर यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले व त्यांच्या साहाय्याने प्रत्येक कुंटुबाला भेट देवून घरातील प्रत्येकाची तपासणी करण्यात आली.
कुष्ठरोग हा आजार पूर्णपणे बरा होणारा आहे. मात्र कुष्ठरोगाबाबत समाजात अंधश्रद्धा पसरली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आजही या रोगांवर उपचार होत नाही. परिणामी दिवसेंदिवस या रोगाचे रुग्ण वाढत आहेत.
झपाट्यावे वाढत असलेल्या या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने आॅक्टोबर महिन्यात कुष्ठरोग शोधमोहीम राबविली. त्यानुसार या पथकाने जिल्हाभरातील चार लाख ५० हजार कुटुंबांना भेट दिल्या. त्याद्वारे १७ लाख एक हजार ७६५ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील पाच हजार ९८९ कुष्ठरोगाचे संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी ३७३ रुग्णांना कुष्ठरोग असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. उल्लेखनीय असे की यात सर्वात जास्त ७०६ संशयित रुग्ण सावली तालक्यात आढळून आले आहे. त्यापैकी ७२ लोकांना कुष्ठरोग असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर राजुरा येथे ५३३ रुग्ण संशयित आढळले. त्यापैकी २६ रुग्णांना कुष्ठरोग असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आला आहे. लवकरच शासनाकडून कुष्ठरोगाच्या निर्मुलनासाठी ठोस पावले उचलली जाणार आहे.
जनजागृतीचा अभाव
कुष्ठरोग हा आजार उपचाराने पूर्णता बरा होऊ शकतो. मात्र ग्रामीण भागात या आजाराबाबत भ्रामक कल्पना व अंधश्रद्धा आहेत. त्यासाठी शासनस्तरावर जनजागृती करणे गरजेचे आहे. त्यामाध्यमातून लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दुरु होऊन ते उपचार करतील. मात्र शासनाकडून योग्य प्रकारे जनजागृती करण्यात आली नाही. त्यामुळेच या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे.
जिल्ह्यात एक हजार २११ पथक
केंद्र शासनाच्या आदेशानूसार जिल्हा आरोग्य विभागामार्फंत कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात आली. यासाठी जिल्ह्यात एक हजार २११ कृष्ठरोग शोधमोहीम पथक तयार करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी एक महिला व एक पुरुष अशी नियुक्ती पथकामध्ये करण्यात आली होती. त्यामध्ये आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, आशा वर्कर यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्यामार्फत प्रत्येक कुंटुबाला भेट देवून घरातील प्रत्येकाची तपासणी करण्यात आली.
राज्यात चंद्रपूर जिल्ह्याचा दुसरा
क्रमांक
दिवसेंदिवस कृष्ठरोगाच्या रुग्णात सातत्याने वाढ होत आहे. शासनस्तरावर कृष्ठरोग नियंत्रणात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र ग्रामीण जनता अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडली असल्यामुळे कुष्ठरोगाचे रुग्ण वाढत आहेत. सन २०१६ च्या आकडेवारीवरुन कुष्ठरोग रुग्णांच्या संख्येत चंद्रपूर जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो.