एकाच आरोग्य केंद्रात पाच वैद्यकीय अधिकारी
By Admin | Updated: April 23, 2016 00:50 IST2016-04-23T00:50:25+5:302016-04-23T00:50:25+5:30
दोन महिन्यांपूर्वी पोंभुर्णा तालुक्यात तापाची साथ पसरली होती. त्यामुळे आरोग्य विभागाची चांगलीच तारांबळ उडाली.

एकाच आरोग्य केंद्रात पाच वैद्यकीय अधिकारी
पोंभुर्णा आरोग्य केंद्र
चंद्रपूर : दोन महिन्यांपूर्वी पोंभुर्णा तालुक्यात तापाची साथ पसरली होती. त्यामुळे आरोग्य विभागाची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र आता तापाची साथ आटोक्यात आली आहे. येथे दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त आहेत. मात्र २० एप्रिलच्या आरोग्य विभागाच्या आदेशान्वये पुन्हा तीन नव्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पोंभुर्णा येथे नियुक्ती देण्यात आली, त्या गावातील रूग्णालयात आरोग्य सेवा बिकट होण्याची शक्यता बळावली आहे.
पोंभुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात आधीच दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त आहेत. त्यात आणखी तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोंभूर्णा येथे २०१२ पासून डॉ. धनगे कार्यरत आहेत. मात्र ते प्रकृतीच्या कारणाने महिन्यातून बरेच दिवस गैरहजर असतात. तर एक पद रिक्त आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडे रिक्त पद भरण्याची मागणी करून हे पद आवश्यक होते. मात्र आरोग्य विभागाने कोणताच निर्णय घेतला नाही. त्यातच नवेगाव मोरे येथील डॉ. निलगेकर यांच्याकडे आरोग्य केंद्राचा प्रभार सोपविण्यात आला.
सध्या येथे दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असतानाही आता आरोग्य विभागाने तोहोगाव, गडीसुर्ला आणि गोवर्धन येथील आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना पोंभुर्णा येथे दहा-दहा दिवस सेवा देण्याचे आदेश बजाविले आहे. २० एप्रिल रोजी देण्यात आलेल्या या आदेशात तिन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रत्येकी दहा दिवस दिवस आरोग्य केंद्रात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मात्र आरोग्य विभागाच्या या निर्णयाने गडीसुर्ला, तोहोेगाव व गोवर्धन येथील आरोग्य सेवा प्रभावित होईल, याचा विचार केल्याचे दिसून येत नाही.
जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या ५८ आरोग्य केंद्रात प्रत्येकी एक वैद्यकीय अधिकारी आहेत. मात्र पोंभुर्णा आरोग्य केंद्रातच तब्बल पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
पोंभुर्णा येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. धनगे हे प्रकृतीच्या कारणाने गैरहजर असतात. पोंभुर्णा आरोग्य केंद्र हे तालुुका मुख्यालयाचे आरोग्य केंद्र असल्याने येथे वैद्यकीय अधिकारी असणे आवश्यक होते. त्यामुळे डॉ. निलगेकर यांच्याकडे प्रशासकीय प्रभार व तोहोगाव, गोवर्धन व गडीसुर्ला येथील आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रत्येकी दहा-दहा दिवस नियुक्ती देण्यात आली आहे.
- डॉ. श्रीराम गोगूलवार,
जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर.