पाच दिवसात कोरोनाने दगावले ४१ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:26 IST2021-04-12T04:26:06+5:302021-04-12T04:26:06+5:30
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. मार्चच्या शेवटपर्यंत दोन ते तीनच्या संख्येत असलेले ...

पाच दिवसात कोरोनाने दगावले ४१ रुग्ण
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. मार्चच्या शेवटपर्यंत दोन ते तीनच्या संख्येत असलेले मृत्यूचे प्रमाण आता दिवसाला १५ ते १६ वर आले आहे. दरम्यान, पाच दिवसांमध्ये ४१ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. या संसर्गाला आवर घालण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत; मात्र काही नागरिक आजही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.रुग्णांची संख्या ज्याप्रमाणे चिंतेची बाब बनत आहे त्यापेक्षा अधिक चिंताजनक बाब म्हणजे, उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूची आहे. मागील आठवडाभरात मृत्यूचे प्रमाण २ ते ३ एवढे होते; मात्र एप्रिल महिन्यामध्ये हा आकडा वाढत आहे. आता तर १५ ते १६ वर मृत्यू संख्या वाढली आहे. ६ ते ११ एप्रिलपर्यंतचा विचार केल्यास या दिवसामध्ये ४१ जणांचा जीव कोरोनाने घेतला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्यावर शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत; मात्र रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आता चिंतेत अधिकच भर पडली आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन बेडसाठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. ६ एप्रिलला २ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ७ एप्रिलला ५ जणांचा, ८, ९ एप्रिलला प्रत्येकी ९ तर १० एप्रिलला सर्वाधिक १६ जणांचा जीव गेला आहे.
असे आहे मृत्यूचे प्रमाण
६ एप्रिल ०२
७ एप्रिल ०५
८ एप्रिल ०९
९ एप्रिल ०९
१० एप्रिल १६
११ एप्रिल ००
बाॅक्स
ज्येष्ठांसह तरुणांचाही समावेश
मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले असून ज्येष्ठांसह आता तरुणांचाही बळी जात आहे. त्यामुळे प्रत्येकाची काळजी घेणे गरजेचे आहे. मागील दोन दिवसांचा विचार केल्यास चार ते पाच तरुणांचा यामध्ये बळी गेला आहे. त्यामुळे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.