शंकरपुरात साकारले जिल्ह्यातील पहिले मॉडेल ग्राम सचिवालय
By Admin | Updated: June 22, 2015 01:08 IST2015-06-22T01:08:55+5:302015-06-22T01:08:55+5:30
इच्छाशक्तीच्या बळावर काहीही होवू शकते. याच ईच्छाशक्तीच्या भरवशावर चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे मॉडेल ग्रामसचिवालयाची वास्तू साकार झाली आहे.

शंकरपुरात साकारले जिल्ह्यातील पहिले मॉडेल ग्राम सचिवालय
मानाचा तुरा : अत्याधुनिक व वातानुकूलित सोयी उपलब्ध
अमोद गौरकार शंकरपूर
इच्छाशक्तीच्या बळावर काहीही होवू शकते. याच ईच्छाशक्तीच्या भरवशावर चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे मॉडेल ग्रामसचिवालयाची वास्तू साकार झाली आहे. अत्याधुनिक व वातानुकूलित सुविधेने हे ग्रामसचिवालय परिपूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील हे पहिलेच ग्राम सचिवालय आहे.
शंकरपूर हे गाव १२ हजार लोकवस्तीचे आहे. या गावचा विकास ग्रामपंचायती मार्फत होत आहे. या गावातील सर्व रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण व डांबरीकरणने तयार झाले आहे. ९० टक्के गाव हागणदारीमुक्त झाले आहे. तर शासकीय इमारती, सभागृह, लॉन बांधून तयार आहेत. तीन मजली डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलाची आकर्षक वास्तू बांधण्यात आली आहे. खाली दोन्ही माळे बेरोजगार युवकांसाठी उद्योग लावण्यासाठी देण्यात आले आहे, तर वरच्या माळ्यात न्यायायशाळा व अभ्यासकेंद्र उभारण्यात आले आहे.
सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या गावात महाराष्ट्रात नसेल असे ग्रामसचिवालय निर्माण करण्याचा मानस ग्रामपंचायतीचे नेतृत्व करणारे जि.प. सदस्य डॉ. सतिश वारजूकर यांनी केला होता. त्या अनुषंगाने त्यांनी जि.प.कडून निधी प्राप्त केला आहे. जुन्या असलेल्या ग्रामसचिवालयावरच दुसऱ्या माळ्याचे बांधकाम सुरु केले. सर्वप्रथम सरपंचाची खोली, कर्मचाऱ्यांची खोली, ग्रामविस्तार अधिकाऱ्याची खोली आणि मिटींग हॉल बांधण्यात आले.
या सर्व खोल्यांमध्ये वातानुकुलित यंत्रणा लावण्यात आली आहे. यासोबतच हे ग्रामसचिवालय संगणकाशी जोडण्यात आले आहे. येथील टेबल, खुर्च्या, बैठक व्यवस्था अत्याधुनिक आहे. सचिवालय पाहणारा नागरिक काही क्षणासाठी का होईना अचंबीत होतो.
जग इंटरनेटशी जोडल्या जात आहे. त्यामुळे हे ग्रामसचिवालय जगाशी जोडण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वत:चे वायफाय नेटवर्क गावात स्थापन केले आहे. त्यामुळे आगामी काळात ग्रामसचिवालय पेपरलेस करण्याचा मानस आहे. याच ग्रामसचिवालयात दोन खाटेचे विश्रामगृह बांधण्यात आले आहे. गावाशेजारी पर्यटनस्थळ आहे. या पर्यटनस्थळाला बघण्यासाठी पर्यटक येत असतात. त्यांना राहण्यासाठी व गावातील पाहुण्यांना राहण्यासाठी उत्तम व्यवस्था या विश्रामगृहात केली आहे. या विश्रामगृहाचे महात्मा ज्योतिबा फुले असे नामकरणही करण्यात आले आहे. गावातील कारभार सांभाळण्यासाठी ग्रामपंचायतीची निर्मिती झाली. परंतु प्रत्येक गावात दोन खोल्यांची ग्रामपंचायत आहे. तेथूनच ते गावाचा कारभार सांभाळल्या जातो. परंतु ईच्छाशक्ती असेल तर ग्रामपंचायत भवन असेही असू शकते, हे शंकरपूर ग्रामपंचायतीने दाखवून दिले आहे. एकूणच जिल्ह्यातील पहिलेवहिले हे ग्रामसचिवालय ठरले आहे.