जिल्हा परिषदेच्या ‘राजकीय’ शाळेचा आज पहिला दिवस

By Admin | Updated: March 21, 2017 00:35 IST2017-03-21T00:35:46+5:302017-03-21T00:35:46+5:30

पंचायत राज व्यवस्थेत जिल्हा परिषदेला मोठे महत्त्व आहे. शासनाच्या अनेक योजना जिल्हा परिषदेच्या मार्फत राबविल्या जातात.

The first day of the Zilla Parishad's 'Political School' is today | जिल्हा परिषदेच्या ‘राजकीय’ शाळेचा आज पहिला दिवस

जिल्हा परिषदेच्या ‘राजकीय’ शाळेचा आज पहिला दिवस

आज ठरणार जिल्ह्याचा मुख्य कारभारी : उपाध्यक्षपदासाठी नवनियुक्त सदस्यांत रस्सीखेच
चंद्रपूर : पंचायत राज व्यवस्थेत जिल्हा परिषदेला मोठे महत्त्व आहे. शासनाच्या अनेक योजना जिल्हा परिषदेच्या मार्फत राबविल्या जातात. त्यामुळे जिल्हा परिषदेत जाण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांमध्ये मोठी चुरस निर्माण होते. या चुरशीच्या लढाईत जिल्ह्यातून ५६ जिल्हा परिषद सदस्य निवडल्या गेले. यामध्ये अनेक सदस्य नवखे आहेत. मात्र याच जिल्हा परिषदेच्या सभागृहात राजकारणाचे बाळकडू शिकायला मिळतात. पाच वर्षे चालणाऱ्या या ‘राजकीय’ शाळेचा आज २१ मार्च मंगळवार हा पहिला दिवस ठरणार आहे.
१९६० ला महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीनंतर जिल्हा परिषदांची निर्मिती झाली. जिल्हा परिषदांच्या मार्फतीने ग्रामीण भागात शासनाच्या अनेक योजना जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ देण्याचे काम या सभागृहात केले जाते. चंद्रपूर जिल्हा परिषदेची पहिली पंचवार्षिक निवडणूक १९६२ ला झाली. या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून अब्दुल शफी यांची निवड झाली होती.
जिल्ह्यातून निवडून आलेल्या ५६ सदस्यांमध्ये अनेक सदस्य राजकीय जीवनात पदार्पण करणार आहेत. ग्रामीण भागात ग्रामपंचायत किंवा संस्थेमध्ये भूषविलेल्या पदाचा काही प्रमाणात या नवख्या शिलेदाराला लाभ होणार आहे. याच जिल्हा परिषदेच्या सभागृहातून राजकीय जीवनाची सुरूवात केलेल्या अनेक शिलेदारानी आमदारकीपर्यंत मजल मारली आहे. त्यांना याच सभागृहात शिकलेल्या राजकीय जीवनाचा लाभ राज्याच्या राजकारणात झाला आहे. पुढील पाच वर्षे चालणाऱ्या या जिल्हा परिषदेच्या सभागृहात अडीच वर्षे काम करण्यासाठी ५६ जिल्हा परिषदेच्या सदस्यामधून एक अध्यक्षाची निवड होणार आहे. त्यामध्ये भाजपाने जादुई आकड्यापेक्षा जास्त सदस्य निवडून आणल्याने भाजपाचा सदस्य अध्यक्ष म्हणून विराजमान होणार आहे. राजकारणाचे चांगले-वाईट अनुभवाचे बाळकडु घेण्यासाठी अनेक जण पहिल्या दिवशी हजेरी लावणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिदेचे सभागृह भरगच्च राहणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षकाकडून पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात येते. त्याचप्रकारे जिल्हा परिषद ‘राजकीय’ शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्याधिकारी शब्दसुमनाने का होईना, स्वागत करणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)

अध्यक्ष म्हणून देवराव भोंगळे यांची निवड निश्चित
जिल्हा परिषदेच्या ५६ जागांपैकी ३३ जागा जिंकून भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविले. तर त्यापाठोपाठ काँग्रेसने २० जागा तर ३ जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले. स्पष्ट बहुमत असल्याने भाजपाला सत्ता स्थापनेसाठी कोणतीही अडचण नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच चंद्रपुरातील एका खासगी हॉटेलमध्ये नवनियुक्त सदस्यांसोबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत ना. सुधीर मुनगंटीवार यांचे विश्वासू देवराव भोंगळे यांची गटनेता म्हणून एकमताने निवड करण्यात आली. त्यामुळे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे.

काँग्रेस गटनेतेपदी
सतीश वारजूकर
जिल्हा परिषदेत काँग्रेसने २० जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. मात्र, काँग्रेसला सत्ता स्थापनेपासून दूर राहावे लागणार आहे. आ. विजय वडेट्टीवार व अन्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चंद्रपुरातील विश्रामगृहात रविवारी बैठक पार पडली. यात काँग्रेस गटनेता म्हणून डॉ. सतीश वारजूकर यांची एकमताने निवड झाली.

उपाध्यक्ष पदासाठी
भाजप सदस्यांत रस्सीखेच
जिल्हा परिषद उपाध्यक्षाची निवडही मंगळवारी होणार असून यासाठी नवनियुक्तांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. या पदासाठी संजय गजपुरे, अर्चना जिवतोडे, नागराज गेडाम, ब्रिजभूषण पाझारे यांची नावे समोर असून यापैकी उपाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, हे मंगळवारीच कळणार आहे.

Web Title: The first day of the Zilla Parishad's 'Political School' is today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.