शाळेचा पहिला दिवस नव्या गणवेशाविनाच

By Admin | Updated: June 28, 2015 01:44 IST2015-06-28T01:44:54+5:302015-06-28T01:44:54+5:30

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना काही विषय वगळता १०० टक्के पुस्तके देण्यात आली.

The first day of school is without new uniform | शाळेचा पहिला दिवस नव्या गणवेशाविनाच

शाळेचा पहिला दिवस नव्या गणवेशाविनाच

१ लाख १२ हजार ७४ विद्यार्थी पात्र : पुस्तके मिळाली, गणवेशाचा निधी आला उशिरा
राजकुमार चुनारकर  खडसंगी

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना काही विषय वगळता १०० टक्के पुस्तके देण्यात आली. मात्र शासनाने विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. गणवेशासाठी सर्वशिक्षा अभियानांतर्गत निधी दिला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांतील १५ पंचायत समितीमधील विद्यार्थ्यांना जुना गणवेश घालूनच शाळेचा पहिला दिवस साजरा करावा लागला.
विद्यार्थी याप्रकारामुळे हिरमुसले असून त्यांच्या स्वागतोत्सवाच्या आनंदावर शासनाच्या नियोजनाअभावी विरजन पडल्याचे दिसून आले. गावागावांत खासगी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. खासगी शाळा विद्यार्थ्यांना आमिष दाखवून आपल्याकडे आकर्षित करीत आहेत. त्यामुळे खासगी शाळेच्या तुलनेत जि.प. व पालिकेच्या शाळांत विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश देण्याचा आदेश शासनाने काढला मात्र, त्यासाठी लागणाऱ्या निधीचे नियोजन करण्यास उशिर झाल्याने चिमूर तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील एक लाख १२ हजार ७४ विद्यार्थ्यांना नव्या गणवेशाविनाच पहिल्या दिवसाचे स्वागत जुन्या गणवेशातच स्विकारावे लागले.
पहिल्या दिवशी वाजत-गाजत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासोबत विद्यार्थ्यांकरिता सांस्कृतिक कार्यक्रमासह, मध्यान्ह भोजनात गोडपदार्थ देण्याच्या सुचना सर्व शाळांना देण्यात आल्या. त्यामुळे बऱ्याच शाळांत नवागतांच्या स्वागताचा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र ज्या प्रमाणात स्वागताचा कार्यक्रम व्हायला पाहिजे, तो झाला नाही.
शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे खासगी शाळा विद्यार्थ्यांना वेगवेगळे आमिष दाखवून आपल्याकडे आकर्षित करीत आहेत. त्यामुळे खासगी शाळांकडे विद्यार्थ्यांचा लोंढा वाढला आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाही तरी देखील मुलांची संख्या खासगी शाळांमध्ये मोठी आहे. खासगी संस्था चालकांकडे शंभरहून अधिक मुलांची वेटींग लिस्ट असताना मात्र जिल्हा परिषदेच्या शाळांकडे मुलांना आकर्षित करण्याकरिता मुलांच्या घरोघरी शिक्षकांना जावे लागत आहे. तरीदेखील मुले आकर्षित होत नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे.
चिमुर तालुक्यातील जिल्हा परिषदांच्या १६१ शाळांसह खासगी शाळातील ११ हजार ५६३ विद्यार्थ्यांकरिता सर्वशिक्षा अभियानांतर्गत ३९ लाख ७४ हजार ८०० रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. याकरिता अनुसूचित जाती, जमाती, दारिद्र्य रेषेखालील सर्व विद्यार्थी यांना गणवेश दिला जाणार आहे. याकरिता पंचायत समितीला निधी अजून प्राप्त झाला नाही.
जिल्ह्यात १५ पंचायत समिती अंतर्गत अनु.जाती-जमाती व दारिद्र्य रेषेखालील १ लाख १२ हजार ७४ विद्यार्थी गणवेशाकरिता पात्र आहेत.
पालकांत नाराजी
गावपातळीवरील शाळा व्यवस्थापन समितीला गणवेश ठरविण्याचा अधिकार देण्यात आला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी बहुतांश शाळांनी गणवेशाचा नाद सोडून दिला. त्यामुळे जुन्या गणवेशातच विद्यार्थ्यांना शाळेचा पहिला दिवस साजरा केला. परिणामी पालक, विद्यार्थी आणि शिक्षकदेखील नाराज झाले आहेत.
इयत्ता पहिली ते आठवीत शिकणाऱ्या सर्व प्रवर्गातील मुली तथा अनुसूचित जाती, जमातीचे व दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यात येणार आहेत. एका विद्यार्थ्याकरिता चारशे रुपये याप्रमाणे निधी येतो. निधी आजच्या तारखेत बँकेत जमा झाला आहे. तो निधी शाळेच्या खात्यात जमा करण्यात येणार असून लवकरच गणवेश देण्यात येतील.
- किशोर पिसे
प्रभारी गटशिक्षणाधिकारी, पं.स. चिमूर
१५ आॅगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची प्रथा आहे पण स्वागतोत्सवाच्या दिवशी म्हणजे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकासह गणवेश सुद्धा मिळायला पाहिजे. पुढच्या सत्रामध्ये पहिल्या दिवशी गणवेश देण्याकरिता प्रयत्न करण्यात येतील.
- डॉ.सतीश वारजकुर
माजी अध्यक्ष तथा जि.प. सदस्य जि.प. चंद्रपूर

Web Title: The first day of school is without new uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.