पहिल्याच नगर परिषदेत तब्बल १६ नवे चेहरे

By Admin | Updated: November 10, 2015 01:39 IST2015-11-10T01:39:48+5:302015-11-10T01:39:48+5:30

नवनिर्मित चिमूर नगर परिषदेच्या निवडणूकीत एकूण सतरा सदस्यांपैकी तब्बल सोळा प्रभागातून मतदारांनी नव्या व बहुतांशी तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे.

The first city council has 16 new faces | पहिल्याच नगर परिषदेत तब्बल १६ नवे चेहरे

पहिल्याच नगर परिषदेत तब्बल १६ नवे चेहरे

केवळ एकाचा अपवाद : मतदारांनी तरुणांनाच सभागृहात पाठविले
राजकुमार चुनारकर खडसंगी
नवनिर्मित चिमूर नगर परिषदेच्या निवडणूकीत एकूण सतरा सदस्यांपैकी तब्बल सोळा प्रभागातून मतदारांनी नव्या व बहुतांशी तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्या अर्थाने नगर परिषदेचे नवे सभागृह ‘तरुण’ बनले आहे.
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, बसपा या पक्षाकडून रिंगणात उतरलेल्या अनेक उमेदवारांना मताची हाफ सेन्चुरीही गाठता आली नाही तर काही उमेदवारांना दोन अंकी आकडाही गाठणे कठीण झाले. पहिल्याच निवडणुकीत सर्वच पक्षांना उमेदवार शोधताना घाम फुटला तर भाजप, काँग्रेसमध्ये चांगलीच बंडखोरी करण्यात आली.
इतिहास जमा झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस, शिवसेना व मनसेचे १७ सदस्य होते. प्रथमच झालेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपाचे स्थानिक आमदार किर्तीकुमार भांगडिया व काँग्रेसचे ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार व काँग्रेसचे डॉ.अविनाश वारजुकर यांनीही निवडणूक प्रतिष्ठेची करीत पूर्ण जवाबदारी भाजपातर्फे आमदार भांगडिया व काँग्रेसचे वारजुकर बंधू यांच्या खांद्यावर दिली होती. काँग्रेस भाजपाला नवीन उमेदवार शोधावे लागले. नवीन उमेदवार दिल्यामुळे भाजपाला सहा तर काँग्रेसला पाच नगरसेवकांना निवडून आणता आले. यामधील अकराही उमेदवार पहिल्याच प्रयत्नात निवडून आले. शिवसेनेकडूनही दोनही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. त्यात तालुका प्रमुख गजानन बुटके यांच्या धर्मपत्नी सीमा बुटके या प्रथमच राजकारणात येत सभागृहात पोहचल्या आहेत.
मावळत्या ग्रामपंचायतीमध्ये सत्ता उपभोगलेल्या सरपंच सदस्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. त्यामध्ये हेमंत जांभुळे, माणिक मनकर, मनिष नंदेश्वर, रत्नमाला मेश्राम व बाळू बोमाडे यांचा समावेश आहे. पहिल्याच नगर परिषदेच्या निवडणुकीत एकूण १७१ उमेदवारांनी आपले भाग्य अजमावले. त्यामध्ये बऱ्याच उमेदवारांनी मताची हाफ सेन्चुरीही करता आली नाही तर अनेकांना दोन अंकी आकडाही गाठता आला नाही.
स्थानिक आमदार भांगडिया यांचे निवासस्थान असलेल्या प्रभाग क्रमांक सहा तिलकवाडीतून शिवसेनेच्या सीमा गजानन बुटके विजयी झाल्या तर भाजपाच्या उमेदवारांना हार पत्करावी लागली. या प्रभागात आमदार किर्तीकुमार भांगडिया यांना आपला उमेदवार निवडून आणता आला नसल्याने चर्चेचा विषय ठरला होता. भाजपाने सहा जागा, काँग्रेस पाच तर शिवसेना दोन तथा अपक्षाने चार जागेतून झेंडा रोवला. भाजपाला सत्तेजवळ पोहचण्यासाठी तीन जागा कमी पडल्या तर काँग्रेसला चार जागा कमी पडल्या. त्यामुळे अपक्ष उमेदवारांना लक्ष्मी दर्शनासह अनेक आॅफर दिल्या जात आहेत.
प्रभाग क्रमांक नऊ मधील अपक्ष उमेदवार दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. सतरा सदस्यीय नगर परिषदेत नऊ महिला प्रतिनिधीत्व करीत आहेत. तर आठ पुरुष यामध्ये नऊ महिला प्रथमच राजकारणात आल्या तर आठ पुरुषसुद्धा प्रथमच सभागृहात पोहचले. त्यामुळे चिमूर नगर परिषदेचे सभागृहात नवखे उमेदवार पोहचले असून त्यापैकी बरेच तरुण आहेत. या तरुणांमुळे चिमूर नगर परिषदेचे सभागृह ‘तरुण’ बनले आहे.

Web Title: The first city council has 16 new faces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.