तब्बल १२ तास चालले आगीचे तांडव
By Admin | Updated: November 1, 2016 00:49 IST2016-11-01T00:49:42+5:302016-11-01T00:49:42+5:30
चंद्रपुरातील अंत्यत वर्दळीचे ठिकाण असलेल्या जटपुरा गेटजवळील समाधान पूर्ती बाजारला रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास आग लागली.

तब्बल १२ तास चालले आगीचे तांडव
चंद्रपूर शहरातील घटना : मनपाचे अग्नीशमन दल आग विझविण्यास अपयशी
चंद्रपूर : चंद्रपुरातील अंत्यत वर्दळीचे ठिकाण असलेल्या जटपुरा गेटजवळील समाधान पूर्ती बाजारला रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीने क्षणार्धात रुद्ररुप धारण केल्याने पूर्ती बाजारातील सर्वच साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळी मनपाचे अग्नीशमन दल दाखल झाले. मात्र आगीवर नियंत्रण मिळविता न आल्याने ही आग सोमवारी दुपारपर्यंत धगधगत होती. त्यामुळे मनपाच्या अग्नीशमन दलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पूर्ती बाजाराला लागलेल्या आगीत सर्वच साहित्य जळून खाक झाल्याने यात सुमारे चार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. रविवारी सर्वत्र दिवाळीच्या फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. दरम्यान, रात्री १२ वाजताच्या सुमारास समाधान पूर्ती बाजारातील वरच्या मजल्यावर आग लागल्याचे चौकीदाराच्या निदर्शनात आले. चौकीदाराने पूर्ती बाजारचे संचालक गिरीश चांडक यांना माहिती दिली. चांडक यांनी अग्निशमन दल व पोलिसांना याची माहिती दिली.
दरम्यान वरच्या मजल्यावर कपड्यांची शोरुम असल्याने आगीचा भडका उडून आगीचा तांडव सुरू झाला. अग्निशमन दल घटनास्थळी पोहचण्यापर्यंत वरच्या मजल्यावरील संपूर्ण साहित्य जळाले होते. तर मुख्य गेट बंद असल्याने अग्निशमन दलातील जवानांना बाहेरुनच आग विझवावी लागली. त्यामुळे आग खालच्या मजल्यावर पोहचून गोदामाकडे वळली.
खालच्या मजल्यावरील लाकडी आलमाऱ्या व विक्रीसाठी असलेल्या तेलाच्या पिंपामुळे आग आणखी भडकली. बाजुच्या कृषी केंद्र व गुपचुप सेंटरलाही आगीने कवेत घेतले. (स्थानिक प्रतिनिधी)
मनपाचे कर्मचारी
अप्रशिक्षीत
महानगर पालिकेच्या अग्निशमन पथकातील कर्मचारी स्वत:च प्रशिक्षित नसल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात ते असमर्थ ठरत होते. त्यानंतर धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, एमईएल, बल्लारपूर पेपर मील, आयुधनिर्माणी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सर्वांनीच आगीवर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत आग धगधगत होती.
पोलीस ठाण्यात
तक्रार दाखल
समाधान पूर्ती बाजारचे संचालक गिरीश चांडक यांनी घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. शहर पोलीस घटनेचा अधिक तपास करीत असून गिरीश चांडक यांची विचारणा केली असता, त्यांनीही आग कशामुळे लागली हे अद्याप समजले नाही, असे सांगितले. या घटनेत चार कोटींचे नुकसान झाल्याची शक्यता त्यांनी वर्तविली.
आग विझवणारे कर्मचारीच असुरक्षीत
घटनेनंतर मनपाचे अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले मात्र आग विझवताना कर्मचारीच असुरक्षीत दिसून आले. कर्मचाऱ्यांकडे सुरक्षा साहित्य नव्हते, तर काही कर्मचारी चप्पल घालूनच आग विझवताना दिसले.
आगीचे कारण अस्पष्ठ
आग कशामुळे लागली, याबाबत मात्र नेमके कारण कळू शकले नाही. मात्र समाधान पूर्ती बाजार बंद झाल्यानंतर रात्री १२ वाजताच्या सुमारास वरच्या माळ्यावरून आग लागल्याचा अंदाज असून फटाक्यामुळे आग लागली असावी, अशी चर्चा परिसरात सुरू होती.
अरूंद रस्त्याची अडचण
रविवारी रात्री घटना घडल्यानंतर अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले मात्र अरूंद रस्त्यामुळे त्यांनाही आग विझवण्यास अडचण येत होती. आग विझवण्याचे यंत्र आगीपर्यंत पोहोचत नव्हते. तर वाहनही दूरवरच ठेवावे लागले. त्यामुळे पाण्याची धार आगीपर्यंत पोहोचत नव्हती.