विसापुरात इलेक्ट्रिक दुकानाला आग
By Admin | Updated: March 12, 2017 01:18 IST2017-03-12T01:18:01+5:302017-03-12T01:18:01+5:30
तालुक्यातील विसापूर येथील रेल्वे चौकाजवळील एका इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला शुक्रवारी मध्यरात्रीला भीषण आग लागली.

विसापुरात इलेक्ट्रिक दुकानाला आग
कारण गुलदस्त्यात : लाखोंची उपकरणे भस्मसात
बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील रेल्वे चौकाजवळील एका इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला शुक्रवारी मध्यरात्रीला भीषण आग लागली. या आगीत लाखोंचे उपकरणे जळून भस्मसात झाली. आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून दुकानदाराला लाखोंचा फटका बसला आहे. नागरिकांच्या सर्तकतेने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.
विसापूर येथील रेल्वे चौकालगत एका धार्मिकस्थळाला लागून तीन-चार दुकानाची चाळ आहे. या चाळीतील इम्रान मोहम्मद यांचे फ्रेंडस इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाचे दुकान आहे. या दुकानाला शुक्रवारच्या मध्यरात्री अचानक आग लागली. या रस्त्याने जाणे-येणे करणाऱ्या नागरिकांना दुकानातून धूर निघत असल्याचेलक्षात आले. त्यांनी दुकान मालकाला घटनेची माहिती दिली. तोपर्यंत आगीने संपूर्ण दुकानाला कवेत घेतले होते. मध्यरात्र असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले. मात्र परिसरातील नागरिकांनी तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर पाण्याचा शिडकाव करून नियंत्रण मिळविले. त्यामुळे लगतच्या इतर दुकानाला आगीपासून वाचविण्यात यश आले. परिणामी येथील रेल्वे चौकात मोठा अनर्थ टळला.
या आगीत इम्रान मोहम्मद यांच्या दुकानातील किंमती साहित्य जळून भस्मसात झाले आहे. त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. यादुकानमालकाने बेरोजगारीवर मात करण्यासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पाच वर्षापूर्वी दुकान सुरू केले होते. अचानक लागलेल्या आगीने व त्यात भस्मसात झालेल्या उपकरणामुळे त्याचेवर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने नुकसान भरपाई देण्याची उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)