ट्रान्सफार्मरची आग पसरून अनेकांचे साहित्य खाक
By Admin | Updated: November 15, 2014 22:43 IST2014-11-15T22:43:25+5:302014-11-15T22:43:25+5:30
येथील कुर्झा वार्डालगत असलेल्या विद्युत ट्रान्सफार्मरला उच्च विद्युत दाबामुळे शुक्रवारी रात्री ११ वाजता अचानक आग लागली. ट्रान्सफार्मरलगतचे तार जळत जाऊन अनेकांच्या घरापर्यंत ही आग पोहचली.

ट्रान्सफार्मरची आग पसरून अनेकांचे साहित्य खाक
ब्रह्मपुरी : येथील कुर्झा वार्डालगत असलेल्या विद्युत ट्रान्सफार्मरला उच्च विद्युत दाबामुळे शुक्रवारी रात्री ११ वाजता अचानक आग लागली. ट्रान्सफार्मरलगतचे तार जळत जाऊन अनेकांच्या घरापर्यंत ही आग पोहचली. यामुळे अनेकांच्या घरचे पंखे, टिव्ही, फ्रिजमध्ये बिघाड आला. परिसरातील २५ हून अधिक विद्युत मीटर जळून खाक झाले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
ब्रह्मपुरी नगर परिषदेअंतर्गत येत असलेला कुर्झा वार्ड येथे यापूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात होती. आता हे गाव नगरपालिकेत समाविष्ट आहे. तरीही याला कुर्झा गाव म्हणूनच संबोधले जाते. शेतकरी व मजूर वर्ग येथे वास्तव्यास आहेत. सध्या हंगाम सुरू असल्याने सायंकाळी लवकर झोपून सकाळी लवकर उठतात. अशातच काल शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास गावाजवळील विद्युत ट्रान्सफार्मरला अचानक आग लागली. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र काळोख पसरला. नेमके काय झाले म्हणून अख्खे गाव जागे झाले. विद्युत ट्रान्सफार्मरमधून आगीचे लोळ निघूू लागले. ट्रान्सफार्मरजवळील विद्युत तारा जळत जाऊन अनेकांच्या घरापर्यंत ही आग पोहचली. त्यात अनेकांच्या घरातील टिव्ही, फ्रिज व पंखे जळाले. ही घटना शिवाजी चौकात घडली. तिथून तार आणखी समोर पेटत जाऊन एक किमीवरील महालक्ष्मी नगर येथेही पोहोचली.
तेथीलही विद्युत ट्रान्सफारमरने पेट घेतला. तेथून पुढे ही आग वाढत जाऊन अनेकांचे विद्युत मीटर जळून खाक झाले.
अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने व सोबतच घरातील साहित्य जळाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. (प्रतिनिधी)