दुकानाला आग लागून ७५ लाखांचे नुकसान
By Admin | Updated: May 10, 2014 00:05 IST2014-05-10T00:05:04+5:302014-05-10T00:05:04+5:30
येथील मुख्य रस्त्यावरील राजधानी कापड दुकानाला शुक्रवारी पहाटे अचानक आग लागली.

दुकानाला आग लागून ७५ लाखांचे नुकसान
घुग्घुस : येथील मुख्य रस्त्यावरील राजधानी कापड दुकानाला शुक्रवारी पहाटे अचानक आग लागली. यात दुकानातील कापड, फर्निचरसह इतर साहित्य जळून खाक झाले. पहाटे ५ वाजताच्या दरम्यान लागलेली आग सकाळी साडेसात वाजेपर्यंत नियंत्रणात आली नव्हती. आग विझविण्याकरिता एसीसी व चंद्रपूर महानगर पालिकेचे अग्निशामक वाहनांना पोलिसांनी पाचारण केले. आगीत सुमारे ७५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घुग्घुस मुख्य मार्गावरील गांधी चौक परिसरात असलेले राजधानी कापड दुकान हे आजुबाजुच्याही गावात प्रसिध्द आहे. आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास दुकानाजवळ राहणार्या एका इसमाला दुकानातून धूर निघताना दिसून आला. त्याने दुकानाच्या समोर राहणार्या व्यक्तीला सांगितले. दुकान चालविणार्या मुस्तफा यांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. दरम्यान घुग्घुस पोलिसांना आगीची माहिती देण्यात आली. पोलिसांनी लगेच एसीसी, वेकोली आणि चंद्रपूर महानगरपालिकेच्या अग्निशमक वाहनांना पाचारण केले. अग्निशमक वाहन येण्यापूर्वी बर्याच लोकांनी बोरींगचे पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग एवढी भिषण होती की आतून धूरच धूर निघत होता. ती आटोक्यात येणे शक्य नव्हते. घुग्घुस पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक वाठनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास यादव यांनी स्वत: जाऊन तातडीने अग्निशामक वाहन आणले आणि लगेच आग विझविण्याचे काम सुरु झाले. त्याचदरम्यान चंद्रपूर महानगरपालिकेचेही अग्निशामक वाहन आले. दोन्ही पथकाने आगीवर नियंत्रण मिळविणे सुरू केले. एसीसीच्या वाहनात दोनदा पाणी भरावे लागले. आग आटोक्यात येईपर्यंत कापड दुकानातील कापड, फर्निचरसह इतर साहित्य जळून खाक झाले. यात ७५ लाखांचे नुकसान झाले. (वार्ताहर)