मूलमधील इलेक्ट्रिकल दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:30 IST2021-01-19T04:30:02+5:302021-01-19T04:30:02+5:30
२० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज मूल : येथील मुख्य मार्गावर बसस्थानकाच्या समोर असलेल्या प्रमोद चतारे यांच्या ...

मूलमधील इलेक्ट्रिकल दुकानाला आग
२० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज
मूल :
येथील मुख्य मार्गावर बसस्थानकाच्या समोर असलेल्या प्रमोद चतारे यांच्या मालकीच्या इलेक्ट्रिकल दुकानाला आग लागल्याने संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. यात सुमारे २० लाखांपर्यंतचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
ही आग शाॅर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
बसस्थानकासमोर असलेल्या माऊली इलेक्ट्रॉनिक या दुकानाला रविवारी रात्री १२ वाजता दरम्यान अचानक आग लागली. या
आगीची माहिती होताच नगर परिषदेच्या अग्निशामकला माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाने आग विझविण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आगीचा एवढा भयानक रुद्रावतार होता की ते विझविण्याकरिता अग्निशामक दलाच्या आठ ते दहा पाणी टँकरने आग विझवावी लागली. या कामात श्रीसाई मित्र परिवाराचे सदस्य रोहित आडगुरवार, देवा गुरनुले यांनी धाडस दाखवित आग विझविण्याकरिता सहकार्य केले. सोमवारी सकाळपर्यंत आग धगधगतच होती. विशेष म्हणजे या भयावह आगीत एकही वस्तू बाहेर काढता आली नाही. संपूर्ण सामान जळून खाक झाले. भिंतीला भेगा पडून प्लास्टर पडले. इलेक्ट्रिकल दुकानातले वायर, फॅन, मोटार, कुलर, हिटर, सबमर्सिबल पंप आदी इलेक्ट्राॅनिक, इलेक्ट्रिकलच्या इतर संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्या. त्यामुळे प्रमोद चतारे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मूल पोलीस पुढील तपास करीत आहेत.