जिल्ह्यात आगीचे तांडव

By Admin | Updated: March 26, 2016 00:39 IST2016-03-26T00:39:51+5:302016-03-26T00:39:51+5:30

या दोन दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात आगीने तांडव घातले. कन्हारगाव वनपरिक्षेत्रातील बांबू डेपोला आग लागली.

Fire in the district | जिल्ह्यात आगीचे तांडव

जिल्ह्यात आगीचे तांडव

लाखोंचे नुकसान : कन्हारगाव, विसापूर, घुग्घुस व चंद्रपुरातील घटना
चंद्रपूर : या दोन दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात आगीने तांडव घातले. कन्हारगाव वनपरिक्षेत्रातील बांबू डेपोला आग लागली. विसापुरातील घराला आगीने कवेत घेतले, घुग्घुसमध्ये एका शाळेला आग लागली तर चंद्रपुरात चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. या घटनात सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी लाखोंचे नुकसान झाले आहे.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील गजबजलेल्या वस्तीत शुक्रवारी भरदुपारी घराला आग लागली. यात शेतीपयोगी साहित्य, जनावरांचा चारा, सिंचनाचे पाईप आगीच्या भक्षस्थानी सापडले. यामुळे दोन भावडांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. नागरिकांच्या सर्तकतेमुळे मोठा अनर्थ टळला. चंद्रपूर महानगरपालिका व बल्लारपूर नगरपालिकेच्या तीन अग्निशमन दलाच्या पथकाने दोन तासाच्या प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळविले. विसापूर येथील बापुराव गोसाई उलमाले व सुभाष गोसाई उलमाले या दोन भावंडाचे घरे एकमेकाला लागून आहेत. त्यांच्या घराला लागून असलेल्या एका घरात जनावरांचे वैरण, सिंचनाचे पाईप व शेतीचे औजारे ठेवली होती. घरातील लोक शेतात कामाला गेले होते. दरम्यान, घरातून धूर निघत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. शेजाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने गावकऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत होते.येथील जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे व उपसरपंच सुनील रोंगे यांनी बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर यांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने बल्लारपूर नगरपालिकेच्या दोन अग्निशमन दलाचे वाहन लगेच घटनास्थळी रवाना केले. त्या पाठोपाठ चंद्रपूर येथील महानगरपालिकेतील अग्निशमन दल दाखल झाले. अग्निशमन दलातील पथकाने शर्तीचे प्रयत्न करून दोन तासात आगीवर नियंत्रण मिळविले. अग्निशमन दलाचे वाहन वेळीच दाखल झाले नसते तर परिसरातील दहा-बारा घरे आगीच्या विळख्यात सापडले असते. मात्र मोठा अनर्थ टळला.
बल्लारपूर तालुक्यातीलच कन्हारगाव वनपरिक्षेत्रातील कन्हारगाव स्थित विक्री आगारातील बांबु डेपोला होळीच्या दिवशी आग लागली. त्यात १० ते १२ हजार बांबु जळून खाक झाला. त्याची विक्री किंमत ३ ते ३ लाख ५० हजार असल्याचे समजते. मात्र वनाधिकारी, कर्मचारी व गावकऱ्यांच्या सतर्कतेने करोडो रुपये किंमतीचा बांबू आगीपासून वाचविण्यात मोठे यश आले.
मध्य चांदा वनविकास महामंडळाचे चारही वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांबु तोडण्याचे काम सुरू आहेत. डिसेंबरपासून प्रत्यक्षात बांबु कटाईच्या कामाला सुरूवात झाली. तोडण्यात आलेला बांबु व बांबु बंडल कन्हारगाव विक्री आगारात विक्रीसाठी साठविण्यात आला आहे. २३ मार्चच्या सायंकाळी ६ वाजता कन्हारगाव क्षेत्रातील कक्ष क्र. ७३ मध्ये वणवा भडकला. त्याची झळ रात्री ८.३० वाजता कन्हारगाव डेपोपर्यंत पोहचली. कक्ष क्र. ७३ ची आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. मात्र अचानकपणे आगीने उग्र रूप धारण करून कन्हारगाव - चिवंडा रोडलगत असलेल्या बांबुपर्यंत पोहचली. त्यात विक्रीसाठी २५ ते ३० लाख बांबु जमा करण्यात आलेला आहे. त्यापैकी १० ते १२ हजार बांबु आगीत जळून खाक झाले. आगीचे भयानक रूप पाहून वनधिकारी व वनकर्मचारी हादरले. बांबुला लागलेली आग आटोक्यात येत नव्हती. दरम्यान, वनाधिकारी प्रफुल निकोडे यांनी कन्हारगावातील जंगलातील आगीवर प्रतिबंधक करण्यासाठी मदत मागितली व सर्व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तदनंतर रात्री १२ वाजता आगीवर पुर्णत: नियंत्रण मिळविण्यात आले.
सहायक व्यवस्थापक वाघ, वनाधिकारी प्रफुल्ल निकोडे, वनवा प्रतिबंधक अधिकारी अजय पवार, कन्हारगावातील उपसरपंच प्रदीप कुळमेथे, पोलीस पाटील, ग्रा.पं. सदस्य व समस्त गावकऱ्यांनी महत्वपूर्ण कामगिरी करीत वनविभागातील महत्वाचे २५ लाख बांबु आगीपासून वाचविले व ३ ते ४ कोटीचे रुपयाचे मोठे नुकसान टळले. (लोकमत चमू)

नकोडा तेलगू हायस्कूलला आग
घुग्घुसजवळ असलेल्या नकोडा जिल्हा परिषद तेलगू हायस्कूलच्या स्टोअर रूमला आग लागली. यात बेंचेस जळाले. एसीसी व चंद्रपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान टळले.ही घटना गुरुवारी दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य ब्रीजभूषण पाझारे , सरपंच तनुश्री बांदूरकर, उपसरपंच आरिफ हनीफ शेख, किरण बांदूरकर यांनी शाळेकडे घाव घेतली.

Web Title: Fire in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.