आपसी वैमनस्यातून धान पुंजण्याला आग
By Admin | Updated: December 3, 2015 01:16 IST2015-12-03T01:16:46+5:302015-12-03T01:16:46+5:30
सावली तालुक्यातील व्याहाड (बुज.) शेतशिवार मंगळवारी रात्री अज्ञात इसमाने येथील कवडू कोंडु शेरकी यांच्या शेतातील धानाचे पुंजण्याला आग लावली.

आपसी वैमनस्यातून धान पुंजण्याला आग
उपरी: सावली तालुक्यातील व्याहाड (बुज.) शेतशिवार मंगळवारी रात्री अज्ञात इसमाने येथील कवडू कोंडु शेरकी यांच्या शेतातील धानाचे पुंजण्याला आग लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले.
या घटनेबाबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. शेताचे मालक कवडू कोंडु शेरकी यांनी आठवडा भरापूर्वी दोन एकर शेतातील हिरा हा उच्च वर्णीय धानाची कापणी केली. १ डिसेंबर रोजी धानाची बांधण केली. जवळपास ४०० भारा निघाला. सर्व भारा एकत्र करुन पुंजणा (ढिग) केला. रात्री ७ वाजेपर्यंत आम्ही शेतातच होतो. कोणीतरी अज्ञाताने रात्रीच्या सुमारास आग लावली असावी, असा संशय त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या घटनेची माहिती बुधवारी सकाळी त्या परिसरात शेताकडे जाणाऱ्या एका शेतकऱ्याने दिल्याचे शेरकी यांनी सांगितले. माहिती मिळताच, शेतात गेलो. मात्र पुंजणा जळून राख झाला होता, अशी माहिती त्यांनी दिली.
धानाच्या पुंजणा जळाल्याची माहिती मिळताच, सरपंच शिला पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष दिवाकर मॅकलवार, दीपक गदेवार, शंकर मेश्राम यांनी शेतात जावून प्रत्यक्ष शेतकऱ्यांची भेट घेवून त्यांना दिलासा दिला. महसूल विभागाचे व्याहाड (बुज.) येथील तलाठी जयश्री कोसुळकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन मोका चौकशी करुन तसा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला असल्याचे सांगितले.
यावर्षी सर्वत्र दुष्काळाचे चित्र असताना अज्ञाताने गरीब शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे जाळल्याने त्याच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. (वार्ताहर)