शाळांच्या किचनमध्येही अग्निशमन यंत्रणा
By Admin | Updated: March 11, 2015 01:01 IST2015-03-11T01:01:13+5:302015-03-11T01:01:13+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळांच्या सुरक्षेबाबत शालेय शिक्षण विभाग गंभीर दिसत आहे. शाळांमधील पोषण आहार शिजणाऱ्या किचनमध्ये व संगणक कक्षाचे फायर आॅडीट करण्यात येणार आहे.

शाळांच्या किचनमध्येही अग्निशमन यंत्रणा
चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या सुरक्षेबाबत शालेय शिक्षण विभाग गंभीर दिसत आहे. शाळांमधील पोषण आहार शिजणाऱ्या किचनमध्ये व संगणक कक्षाचे फायर आॅडीट करण्यात येणार आहे. या ठिकाणीही आता अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
आघाडी सरकारच्या काळात मंत्रालयाला आग लागल्यानंतर शासकीय यंत्रणा अलर्ट झाली होती. राज्यभरातील इमारतींचे व शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालयांचे फायर आॅडीट करण्याच्या सूचना शासनाने संबंधित महानगरपालिका व नगरपालिकांना दिल्या होत्या. मात्र ही कार्यवाही कालांतराने कागदोपत्रीच गुंडाळून राहिली. त्यामुळे आगीसारख्या घटना घडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्रकार अनेकदा घडला. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शालेय पोषण आहार देण्याची योजना अमलात आली. हा आहार शाळांमध्ये शिजविला जातो. याशिवाय जिल्हा परिषदेच्या शाळांमधून संगणकाचे शिक्षण देणे सुरू झाले. शालेय पोषण आहार शिजणाऱ्या किचनमध्ये केव्हाही आगीसारखी घटना घडू शकते. शिवाय संगणक कक्षात विजेचा वापर असल्याने शार्ट सर्कीटसारखी दुर्घटना घडू शकते. असे असतानाही या ठिकाणी आजपर्यंत अग्निशमन यंत्रणा लावण्यात आलेली नाही. आता मात्र शिक्षण विभागाने हा दोष दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील किचनमध्ये व संगणक कक्षात अग्निशमन यंत्र बसविण्यात येणार आहे. प्रत्येक शाळांना तीन अग्निशमन यंत्र याप्रमाणे तालुका पातळीवर याचे वितरण करण्यात येणार आहे. या योजनेसाठी सवितरण अधिकारी म्हणून शिक्षण संचालक (प्राथमिक) यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)