आगीत ४०० बंड्या तणस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 00:54 IST2017-04-18T00:54:03+5:302017-04-18T00:54:03+5:30
शॉर्ट सर्कीटने अचानक लागलेल्या आगीत तब्बल २१ शेतकऱ्यांची ४०० बड्या तणस, व २५ ते ३० बंड्या जळाऊ लाकडे जळून खाक झाले.

आगीत ४०० बंड्या तणस जळून खाक
२१ शेतकऱ्यांचे नुकसान : व्याहाड बुज. येथील घटना
सावली : शॉर्ट सर्कीटने अचानक लागलेल्या आगीत तब्बल २१ शेतकऱ्यांची ४०० बड्या तणस, व २५ ते ३० बंड्या जळाऊ लाकडे जळून खाक झाले. ही घटना तालुक्यातील व्याहाड बुज. येथील शेतशिवारात रविवारी दुपारच्या सुमारास घडली. अचानक लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.
व्याहाड बुज. येथील डोंगरी परिसरात नवभारत शाळेच्या मागील भागात दिवाकर भुरसे यांच्या मालकीची राईस मिल असून, त्यालगतच मोकळ्या जागेवर शेतकऱ्यांनी कुंपन करून गुरांचा चारा (तणस) ठेवला होता. रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक शॉर्टसर्कीटमुळे या परिसरात आग लागली. २० ते २५ शेतकऱ्यांचे तणसीचे ढीग या भागात असल्याने एका ढिगाला आग लागताच पाहता-पाहता आगीने संपूर्ण परिसर वेढला गेला. आणि तब्बल ४०० बंड्या तणस जळून खाक झाली. आगीची घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मूल आणि ब्रह्मपुरी येथून अग्नीशामक गाड्या बोलाविण्यात आल्या. पाच ते सहा तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्नीशामक दलाला यश आले. मात्र तोपर्यंत तणस, जळाऊ लाकडे जळून खाक झाले. या घटनेत नंदाजी भोयर, प्रभाकर भोयर, गोपाळा भोयर, नेमाजी पुण्यप्रेड्डीवार, राकेश पिंपळशेट्टीवार, नामदेव पेंदोरकर, सुरेश कागदलवार, जयंत संगीडवार, मुकरू निकुरे, पत्रू निकुरे, देवाजी राऊत, मुकरू शेंडे, गुरूदास पेंदोरकर, गंगाधर पेंदोरकर, डंबाजी कांबळे, दादाजी गेडाम, हरिदास चौधरी, आबाजी कांबळे, वनिता कांबळे, मारोती गेडाम, शिवाजी रूद्रपवार, टेमसू पोहनकर आदी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच सावलीचे तहसीलदार डी.एस. भोयर, नायब तहसीलदार दिगलवार, पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. (तालुका प्रतिनिधी)