अनाथ-निराधार मुलींना आर्थिक मदत
By Admin | Updated: September 14, 2016 00:45 IST2016-09-14T00:45:34+5:302016-09-14T00:45:34+5:30
स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात भद्रावती येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रोटरी क्लब आफ भद्रावती यांचे ...

अनाथ-निराधार मुलींना आर्थिक मदत
‘लेक वाचवा’ अभियान : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात भद्रावती येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रोटरी क्लब आफ भद्रावती यांचे संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून ‘लेक वाचवा’ या अभियानांतर्गत अनाथ व निराधार मुलींना आर्थिक मदत देण्याचा संकल्प कार्यक्रम आयोजित केला होता.
या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुर्डे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष डॉ.रजनीताई हजारे, तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभान सौदागर, रोटरी क्लब आॅफ भद्रावतीचे अध्यक्ष अविनाश सिद्धमशेट्टीवार, सचिव प्रा. विनोद घोडे, जाकीरभाई, परवेज सौदागर, विशाल बोरकर, अमोल नक्षिणे, ग्राहक पंचायत अध्यक्ष पुरुषोत्तम मत्ते, रमेश खातखेडे, प्राचार्य डॉ.एन.जी. उमाटे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. उमाटे यांनी केले. डॉ. रजनीताई हजारे म्हणाल्या की, विवेकानंद महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनप्रसंगी एका स्तुत्य उपक्रमाला सुरुवात केली. ही आनंदाची बाब आहे. समाज साक्षर होऊन, अनाथ मुली होणार नाही, निराधार राहणार नाही, स्त्रीला जगण्याचा हक्क मिळावा, निसर्गातील कळीचे फुुलात रूपांतर व्हावे. त्याप्रमाणे मुलीला फुलू उमलू द्या. या न्यायाने त्या मुलींना आर्थिक मदत देवून आपला वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला आहे. याबाबत मला आनंद वाटत आहे. अशा प्रकारे लेकी वाचवण्यासाठी अनेक लोकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. मोरेश्वरराव टेमुर्डे म्हणाले की, ‘लेक वाचवा’ या न्यायाने समाजाने मुलीकडे पाहायला पाहिजे. स्त्री ही माता आहे. ती समाजाची उद्धारकर्ती आहे. म्हणून मातेला समाजात, कुटुंबात आद्यस्थान मिळाले आहे. आजच्या तरुणांनी स्त्री ही माता, बहीण समजून मदत तसेच सेवा करावी. त्याचबरोबर समाजातील दानशूर लोकांनी एकत्र येवून अशा अनाथ व निराधार मुलींना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी अध्यक्षीय भाषणातून सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ.जे.पी. राखुंडे तर आभारप्रदर्शन डॉ.यू.सी. घोसरे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
दोन विद्यार्थिनींच्या नावे मुदतठेव
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कार्यक्रमाप्रसंगी प्रा. विनोद घोडे व विशाल बोरकर यांनी एकूण १० हजार रुपये सदर मुलींना देण्याचे निश्चित केले. परवेज सौदागर यांनी शारदा भोंगे व सलोनी ढोक या विद्यार्थिनींना प्रत्येकी सहा हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये त्यांच्या नावे १० वर्षांंसाठी फिक्स डिपाजिट करून मुदतठेव प्रमाणपत्र देण्यात आले.