बँकेची ३५ वी वार्षिक साधारण सभा २७ मार्च २०२१ रोजी झाली. कोविड १९ मुळे बँकेचे सभागृह, ओमभवन तसेच वरोरा, राजुरा, ब्रह्मपुरी, चिमूर शाखा कार्यालयात व्हीसीद्वारे व्यवस्था करण्यात आली. या सभेत २५० सदस्यांनी सहभाग घेतला. सर्वच सदस्यांनी एकमताने विषयसुचीवरील १ ते २० विषय मंजूर केले. काही सदस्यांनी वेळेवर विषय मांडले. त्या विषयांनाही सर्वानुमते मंजुरी मिळाल्याचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी सांगितले. बँकेतून शिक्षक व शिक्षकेतर सुमारे १४ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन होता. त्यामुळे कोअर बँकींग सोल्युशनमध्ये अद्ययावत सुधारणा करण्याचा निर्णय संचालक मंडळाने मंजूर केला. बँकेच्या कर्ज धोरणातील बदल, शेतकरी कल्याण निधी, कर्ज घेणाऱ्यांकडून कागदपत्रांची पूर्तता करताना इक्वीटेबल मॅनेज शेतकऱ्यांकडील थकीत भांडवली कर्जावरील व्याज सवलतीबाबत तसेच ग्राहक, ठेवीदार व कर्जदारांच्या मागणीनुसार संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयासंदर्भात आमसभेला अवगत केल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष रावत यांनी दिली.
ऑडिट अहवालानुसार जुनी इमारत वापरण्यायोग्य नाही
चंद्रपूर शाखेला स्वत:ची इमारत व खुली जागा आहे. सध्याची इमारत व जागा बिल्मोरीया यांच्याकडून १९६८ मध्ये खरेदी करण्यात आली. ही इमारत जुनी झाली आहे. ऑडिट अहवालानुसार वापरण्यायोग्य नाही. त्यामुळे इमारत पाडून त्या जागेवर बँक कार्यालयासोबतच शेतकरी निवासस्थान व बचत गटांना त्यांच्या माल विक्रीसाठी नवीन बांधकाम करण्याच्या निर्णयाला संचालक मंडळाने मंजुरी दिल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी दिली.