अखेर नगरपालिका कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू
By Admin | Updated: June 14, 2015 01:55 IST2015-06-14T01:55:20+5:302015-06-14T01:55:20+5:30
जानेवारी महिन्यापासून नगर परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नाही.

अखेर नगरपालिका कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू
ब्रह्मपुरी : जानेवारी महिन्यापासून नगर परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नाही. यापूर्वी कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करूनही काहीच तोडगा निघाला नसल्याने आज शनिवारी नगर परिषदेच्या कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केले आहे.
चार महिन्यांपासून वेतन झाले नाही. वेतनाच्या भरवशावर आरडी एलआयसी, गटविमा, कर्ज हफ्ते, मुलांची अॅडमिशन फी या सर्वाचे नियोजन होत होते. मात्र वेतनच न झाल्याने सर्व प्रकारचे देणे कार्यालयामार्फत चुकविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे त्या सर्व योजना बंद पडल्या आहेत. उदरनिर्वाहाच्या समस्येबरोबरच अन्य समस्यांही समोर उभ्या असल्याने कर्मचाऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी शासनाला कर्मचाऱ्यांनी निवेदन देऊन १३ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून वेतनाची रक्कम देण्याबाबत मागणी केली. परंतु शासनाने वेगळे परिपत्रक काढून आपली जबाबदारी झटकल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा हत्यार आजपासून उगारला असल्याने नागरिकांची कामे, स्वच्छता पाणी पुरवठा व अन्य कामकाजावर परिणाम होणार आहे. शासनाने दखल घेऊन ताबडतोब वेतन द्यावे, अशी मागणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हरिदास लाडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)