अखेर सभापतींच्या माफीने सभेला सुरूवात
By Admin | Updated: February 12, 2015 00:51 IST2015-02-12T00:51:54+5:302015-02-12T00:51:54+5:30
पंचायत समितीच्या मासिक सभेला सुरुवात होण्यापूर्वी आजी- माजी सभापती व उपसभापतीमध्ये शाब्दिक वाद झाला. अखेर सभापतींनी माफी मागितल्यावर सभेला सुरुवात झाली.

अखेर सभापतींच्या माफीने सभेला सुरूवात
ब्रह्मपुरी : पंचायत समितीच्या मासिक सभेला सुरुवात होण्यापूर्वी आजी- माजी सभापती व उपसभापतीमध्ये शाब्दिक वाद झाला. अखेर सभापतींनी माफी मागितल्यावर सभेला सुरुवात झाली.
पंचायत समितीच्या सभागृहात मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभागृहात माजी सभापती वंदना शेंडे व माजी उपसभापती नामदेव लांजेवार गेले असता त्यांच्या नावाची खुर्ची सभागृहातील सर्वात शेवटच्या रांगेत लावण्यात आली होती. प्रोटोकालनुसार माजी पदाधिकाऱ्यांची खुर्ची कुठे लावली जावी, याचेही संकेत आहेत. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी माजी पदाधिकाऱ्यांची बसण्याची व्यवस्था मागच्या रांगेत केली होती. परंतु हा प्रकार पाहून माजी पदाधिकारी संतापले. यापूर्वी खुर्चीवर नावाची पट्टी लावली जात नव्हती. नवीन सभापतींनी हा प्रकार आपल्या कार्यपद्धतीचा भाग म्हणून खुर्चीवर नावाची पट्टी लावली. परंतु त्याचा परिणाम उलटा झाला. यावरून आजी- माजी पदाधिकाऱ्यांमध्ये वादही झाला. लगेच माजी पदाधिकारी व काही सदस्य बाहेर आले व दुसऱ्या कक्षात जाऊन बसले. झालेला सर्व प्रकार पाहून कर्मचाऱ्यांना वाईट वाटले. कर्मचारी ‘त्या’ कक्षाकडे येऊन त्यांनी माजी पदाधिकाऱ्यांची माफी मागितली. परंतु माजी पदाधिकाऱ्यांचे यावर समाधान झाले नाही. अखेर चक्क सभापतींनी त्या कक्षात जाऊन माफी मागितल्यानंतर हा वाद निवळला व सभेला सुरुवात झाली. पंचायत समितीमध्ये उपसभापती पद भाजपाकडे असूनही भाजपाच्या माजी पदाधिकाऱ्यांचा होणारा अपमान हा यावेळेस चर्चेचा विषय होता. (तालुका प्रतिनिधी)