अखेर शेतकऱ्यांना मिळाले पाणी
By Admin | Updated: September 1, 2016 01:28 IST2016-09-01T01:28:49+5:302016-09-01T01:28:49+5:30
मागील अनेक दिवसांपासून पाण्याने पाठ फिरविल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. हातात आलेले पीक वाचविण्यासाठी धडपड सुरु आहे

अखेर शेतकऱ्यांना मिळाले पाणी
मुनगंटीवार यांचे प्रयत्न : शेतकऱ्यांचे विद्युत बिल माफ
मूल : मागील अनेक दिवसांपासून पाण्याने पाठ फिरविल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. हातात आलेले पीक वाचविण्यासाठी धडपड सुरु आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ही बाब माहीेत होताच त्यांनी पाणसाऱ्यापैकी ४१ लाख रुपयांचा भरणा करुन शेतीसाठी हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. ना. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून सात गावातील शेकडो शेतकऱ्यांना हरणघाट उपसा जलसिंचन योजनेचे पाणी शेतकऱ्यांना मिळत आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष चंदू मारगोनवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील दर्पण सार्वजनिक वाचनालयामध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मारगोनवार पुढे म्हणाले, हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्पाअंतर्गत बोरचांदली, राजगड, विरई, फिस्कुटी, गडीसुर्ला, जुनासूर्ला आणि बेंबाळ ही सात गावे आहेत. मागील अनेक वर्षापासून सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे या भागातील शेतकऱ्यांकडे हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या पाण्यासाराची रक्कम थकीत आहे. ही थकबाकी सुमारे एक कोटी २५ लाखांपर्यंत गेली आहे. यावर्षी पावसाने सुरुवातीला दाखविलेला जोर आता ओसरला आहे. पाण्याअभावी पीक करपायला लागली आहे. अनेकांचे तर अजून रोवणेही बाकी आहे.
शेतकऱ्यांनी हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्याची विनंती केली. परंतु जुन्या थकीत रकमेमुळे पाणी सोडण्यास नकार दिला. अशा स्थितीत शेतीसाठी पाण्याची नितांत गरज असल्याने हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन परिसरातील शेतकऱ्यांनी मुनगंटीवार यांना दिले. निवेदनातून शेतकऱ्यांनी मांडलेली अडचण लक्षात घेऊन त्यांनी शासनाच्या देखभाल दुरुस्ती निधीतून ४१ लाख रुपये भरणा केली आणि उपसा जलसिंचन प्रकल्पातून तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुनगंटीवार यांच्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्यामुळे या परिसरातील शेतकरी पार भारावून गेल्याचेही मारगोनवार यांनी यावेळी सांगितले. सदर प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलेले असल्यामुळे शेवटच्या टोकावर वसलेल्या दिघोरी या गावापर्यंत पाणी पोहचत आहे. या प्रकल्पाच्या नहराचेही काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश ना. मुनगंटीवार यांना जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. पत्रकार परिषदेला चांदापूरचे माजी उपसरपंच राजू पोटे, भाजयुमोचे महामंत्री दिलीप पाल, नवथाव वाढई, अभिषेक पोरेड्डीवार उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)