रतन टाटा यांच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: January 4, 2017 00:51 IST2017-01-04T00:51:50+5:302017-01-04T00:51:50+5:30
देशातील प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांच्या उपस्थितीत टाटा ट्रस्ट व वनविभागात चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्राबाबत सामंजस्य करार होणार आहे.

रतन टाटा यांच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात
सामंजस्य करार होणार : जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा
चंद्रपूर : देशातील प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांच्या उपस्थितीत टाटा ट्रस्ट व वनविभागात चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्राबाबत सामंजस्य करार होणार आहे. यासोबतच अन्य कार्यक्रमही आयोजित करण्यात आले असून ५ जानेवारी रोजी चांदा क्लब मैदानावर होणाऱ्या या भव्य सोहळयाच्या तयारीचा आढावा मंगळवारी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी घेतला. त्यांनी मैदानाला प्रत्यक्ष भेट देवून तयारीची पाहणी केली.
आढावा बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, उपवनसंरक्षक आर. पी. धाबेकर, कार्यकारी अभियंता अरुण गाडेगोणे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री तथा राज्याचे वित्त आणि नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सदर सामंजस्य करार होणार आहे. चिचपल्ली येथे टाटा ट्रस्टच्या माध्यमातून अत्याधुनिक बांबू प्रशिक्षण केंद्र उभे राहणार असून त्या अनुषंगाने सामंजस्य करार व अन्य कार्यक्रम चांदा क्लब मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. सदर सोहळा संस्मरणीय करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी सुरु आहे.
साधारणत: सहा हजारावर नागरिक या सोहळ्यास उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने प्रशासनाची तयारी सुरु आहे. कार्यक्रमाचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले असून प्रत्येक बाब व्यवस्थीतपणे पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांच्या प्रमुखतेत समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. सामान्य नागरिकांसह अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक, उद्योजक, संयुक्तवन व्यवस्थापन समित्यांचे पदाधिकारी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार असल्याने बैठक व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, नास्ता, पाणी, पोलीस बंदोबस्त, पार्कींग, वेगवेगळे स्टॉल आदींचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.
बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चांदा क्लब मैदानावरील तयारीची पाहणी केली. यावेळी आवश्यक सुचनाही त्यांनी केल्या. बसण्यासाठी प्रत्येक पत्रकार, कर्मचारी, नागरिक यांचे स्वतंत्र कक्ष करुन त्या ठिकाणी बसण्याची सुव्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. (स्थानिक प्रतिनिधी)