घोडपेठ येथील फिल्टर प्लांट योजना अखेर मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:11 IST2021-01-13T05:11:15+5:302021-01-13T05:11:15+5:30
घोडपेठ : येथील प्रस्तावित फिल्टर प्लांट योजना चार वर्षांच्या अथक पाठपुराव्याने शेवटी मंजूर करण्यात आली आहे. जि.प. सदस्य यशवंत ...

घोडपेठ येथील फिल्टर प्लांट योजना अखेर मंजूर
घोडपेठ : येथील प्रस्तावित फिल्टर प्लांट योजना चार वर्षांच्या अथक पाठपुराव्याने शेवटी मंजूर करण्यात आली आहे.
जि.प. सदस्य यशवंत वाघ व ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विनोद घुगुल यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आता गावकऱ्यांना आरओचे शुद्ध पाणी घरोघरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी जलस्वराज टप्पा २ या योजनेतून प्रत्येक घरी नळाचे कनेक्शनही करण्यात आलेले आहेत. घोडपेठ येथील पाण्याची बिकट समस्या लक्षात घेता गावातील नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी घोडपेठ नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत गोरजा गावातील तलाव प्रस्तावित होता. परंतु यासाठी गोरजा येथील नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे प्रत्यक्ष काम करणे शक्य झाले नाही.
त्या अनुषंगाने घोडपेठ गावाकरिता पाण्याचे स्रोत म्हणून विंधन विहीर घेण्यात आली. परंतु घोडपेठ येथील विंधन विहिरीचे पाणी जड असल्याने विभागाने प्रस्तावित विंधन विहिरीच्या स्रोताची रासायनिक तपासणी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर (नीरी) यांच्याकडून करण्यात आली. नीरीच्या अहवालानुसार घोडपेठ येथे पॅकेज ट्रीटमेंट प्लांटची आवश्यकता आहे, असे नमूद करण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या चंद्रपूर विभागाने घोडपेठ येथे पॅकेज ट्रीटमेंट प्लांट बसविण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.