तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा

By Admin | Updated: February 9, 2016 00:55 IST2016-02-09T00:55:53+5:302016-02-09T00:55:53+5:30

भद्रावती तहसील कार्यालयामध्ये सहा कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. सदर पदे रिक्त असल्याने कार्यालयीन कामकाजात खोळंबा निर्माण होत आहे.

Fill vacant posts of Tehsil office | तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा

तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा

निवेदन दिले : वानखेडे यांची मागणी
भद्रावती : भद्रावती तहसील कार्यालयामध्ये सहा कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. सदर पदे रिक्त असल्याने कार्यालयीन कामकाजात खोळंबा निर्माण होत आहे. तसेच ग्रामीण भागातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
भद्रावती तहसील कार्यालयात कनिष्ठ लिपिकाचे तीन पदे, एक अव्वल कारकून, एक कनिष्ठ लिपीक पदे रिक्त आहेत. या सर्व प्रकरणाची संपूर्ण माहिती असतानासुद्धा आपल्या कार्यालयातून एक आदेश निर्गमित करुन कनिष्ठ लिपीक प्रणाली खिरटकर यांचे स्थानांतर तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे करण्यात आले. मी स्वत: एका लाभार्थ्यांच्या कामानिमित्त तहसील कार्यालयात गेलो असता रिक्त पदांबाबत मला माहिती मिळाली, असे विजय वानखेडे यांनी नमूद केले आहे.
कनिष्ठ लिपीक प्रणाली खिरटकर यांचे स्थानांतर केल्यामुळे या कार्यालयात एकूण सात पदे रिक्त झाली आहेत. यामुळे कार्यालयीन कामकाजावर फरक पडला आहे. भद्रावती तालुक्यातील इतर तालुक्यासोबत तुलना केली तर भद्रावती तालुक्यात कर वसुलीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तसेच इतर तालुक्यांपेक्षा भद्रावती तालुका लोकसंख्येच्या मानाने मोठा आहे. सदर तालुक्यात शहरीकरण व औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जमिनीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर तक्रारी वाढत आहे. तहसील कार्यालयातील अत्यल्प कर्मचारी संख्येमुळे अनेक कामे प्रलंबित राहत आहे.
संजय गांधी निराधार योजना विभागातील एक पद रिक्त असतानासुद्धा कनिष्ठ लिपिक बावणकर यांची सेवा जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे संलग्न केल्यामुळे भद्रावती तहसील कार्यालयात एकूण सहा पदे रिक्त झाली आहेत. सदर पदे रिक्त असल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे कामातही अनियमितता वाढत आहे.
भद्रावती तालुक्यातील तहसील कार्यालयात रिक्त असलेल्या पदांचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करुन रिक्त असलेल्या सहा कर्मचाऱ्यांच्या जागा त्वरित भरण्यात याव्या, अशी मागणी जि.प. सदस्य विजय वानखेडे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Fill vacant posts of Tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.