मानव मिशन योजनेची व्याप्ती वाढवा
चंद्रपूर : आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थिनींनी बसद्वारे शाळेत जाता यावे, याकरिता मानव मिशन योजना सुरू करण्यात आली. शिवाय, विद्यार्थिनींनी सायकलसाठी तीन हजार रुपयांची मदत मिळते. ही मदत तोकडी असल्याने समस्या सोडण्याची मागणी होत आहे.
बँकांकडून कर्ज मिळत नसल्याने निराशा
भद्रावती : तालुक्यात रोजगाराभिमुख उद्योगांचा अभाव आहे. बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येते. उद्योग नसल्याने युवकांमध्ये निराशा पसरत आहेत. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
रस्त्यांवरील झुडपे ठरत आहेत जीवघेणे
सावली : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. व्याहाड, अंतरगाव, मुडझा रस्ता, निफंद्रा, डोंगरगाव, बोरखळा, करोली, निफंद्रा, मंगरमेंढा बारसागड, मेहा, गेवरा, सायखेडा, पालेबारसा, विरखल चक, हिरापूर अंतरगाव ते मेहा रस्त्यांवर दोन्ही बाजूला मोठी झुडपे वाढली आहेत. काही मार्गांवर अपघातही झाले.
रस्त्याचे काम त्वरित करा
चंद्रपूर :गडचांदूर ते भोयेगाव रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र सदर काम अत्यंत संथगतीने सुरु असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गडचांदूर परिसरात सिमेंट कंपन्या असल्यामुळे या रस्त्याने मोठ्या प्रमाणात जड वाहतूक असते. त्यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहे.
नागभिडात साकारताहेत स्विमिंग पूल
नागभीड : तालुका क्रीडा संकुलांतर्गत खनिज विकास निधीमधून नागभीड येथे स्विमिंग पुलाची निर्मिती होणार आहे. यासाठी एक कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूलाच एक एकर जागेत हे स्विमिंग पूल साकारणार आहे. त्यामुळे पोहण्यासाठी सोईचे होणार आहे.
धूर फवारणी करण्याची मागणी
वरोरा : शहरात डासांची उत्पत्ती वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. नगर परिषद प्रशासनाने मच्छरांच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काही मोकळ्या भूखंडांवर आजही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
जॉबकार्ड देण्याची मागणी
देवाडा बुज : रोजगार हमी योजनेच्या मजुरांना जाॅबकार्ड देण्याची मागणी मजूरवर्गाने केली आहे.
पोभुर्णा तालुक्यातील अवघड क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या देवाडा बूज या ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला असून, या कामावर दोनशे मजूर कामाला आहेत. कोराेना परिस्थितीच्या काळात मजुरांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती.
अशा बिकट परिस्थितीत मजुरांना दिलासा जरी मिळाला असला, तरी काही गावांतील मजुरांना जॉब कार्ड मिळाले नसल्याने संबंधित मजुरांना कामापासून मुकावे लागत आहे. आजच्या परिस्थितीत प्रत्येक कामासाठी जॉबकार्ड मागण्यात येते. त्यासाठी नागरिकांकडे जाॅबकार्ड असणे अगदी महत्त्वाचे झाले आहे. तेव्हा ग्रामपंचायत प्रशासनाने मजुरांच्या हिताचे मौलिक कार्य हाती घेऊन मजुरांना विनामूल्य जाॅबकार्ड देण्याची मोहीम राबवावी, अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.
झाडांना सकाळच्या वेळेस पाणी टाकावे
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून तापमान वाढत आहे. दरम्यान, रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या झाडांना कंत्राटदारामार्फत पाणी टाकले जात आहे. मात्र सदर पाणी सकाळी ११ तसेच दुपारीही टाकले जात आहे. त्यामुळे झाडांना फायदा होण्यापेक्षा नुकसानच होत आहे. त्यामुळे पाणी टाकताना सकाळचीच वेळी पाणी टाकावे, अशी मागणी सामाजिक कार्यकत्यांकडून केली जात आहे.
बँकेअभावी ग्राहकांची होतेय गैरसोय
जिवती : तालुक्याचे ठिकाण असले तरी येथे राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेत येथे राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. या ठिकाणी एकही राष्ट्रीयीकृत बँक नाही. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. जिवती हे तालुक्याचे ठिकाण आहे. येथे नगर पंचायत स्थापन झाली आहे. एवढे असतानासुद्धा राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने नागरिकांची अडचण होत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
परवानगी घेण्यासाठी नागरिकांची धावपळ
चंद्रपूर : कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्रादूर्भाव टाळण्यासाठी प्रशासकीय स्तरावर विविध पाऊल उचलले जात आहे. कार्यक्रमांवरही बंदी आली असून परवानगी घेण्यासाठी नागरिकांची धावपळ आहे.
पक्षांसाठी ठेवत आहे पात्रात पाणी
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. त्यातच जलाशयही आता आटत असल्यामुळे पक्षांना पाणी मिळावे यासाठी शहरातील काही नागरिक पात्रामध्ये पाणी भरून ते पक्षांसाठी ठेवत आहे.
बचतगटांना कर्ज उपलब्ध करून द्यावे
चंद्रपूर : जिल्ह्यात महिला बचतगटांची संंख्या बरीच असून, कर्जाअभावी स्वयंरोजगार उभे करण्यासाठी अपयश येत आहे. राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज उपलब्ध होत नसल्याने महिला बचतगटांमध्ये निराशा पसरली आहे. लहान व्यवसायातून आर्थिक मोबदला मिळत नाही. कुटुंब चालविले कठीण होते. राष्ट्रीयीकृत बँकांनी महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महिलांनी केली आहे.
अतिक्रमणामुळे गुरे चराईची समस्या
चंद्रपूर : शहरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येत आहेत. शासकीय जमिनीवरही अनेकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. वनजमिनीवरही हिरवळ नष्ट झाल्याने, शहरातील जनावरांना चराईसाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे कचरा आणि टाकाऊ पदार्थ खाऊन त्यांना जगावे लागत आहे.
कोरपना-वणी रस्त्याचा मुहूर्त सापडला
कोरपना : तालुक्यातील कोरपना-वणी मार्गावरील कोरपना ते कोडशी खू पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या संपूर्ण डांबरीकरण व डागडुजीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे वाहतूकदारांची मोठी गैरसोय दूर हाेईल. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रात्रीच्यावेळी प्रवास करणे अत्यंत जोखमीचे ठरत होते.
राजस्व अभियान सुरू ठेवण्याची मागणी
जिवती : तालुका प्रशासनाच्या वतीने तहसील कार्यालयात राजस्व अभियान राबविण्यात येत होते. या अभियानामुळे परिसरातील नागरिकांना विविध प्रकारचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तहसील कार्यालयातील दैनंदिन कामकाजामुळे अनेक प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.