खोट्या तक्रारीवरुन नांदेडच्या दोन युवकांविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: May 9, 2015 01:03 IST2015-05-09T01:03:51+5:302015-05-09T01:03:51+5:30
खोट्या तक्रारीच्या आधारे नागभीड पोलिसांनी नांदेडच्या दोन व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.

खोट्या तक्रारीवरुन नांदेडच्या दोन युवकांविरुद्ध गुन्हा दाखल
नागभीड : खोट्या तक्रारीच्या आधारे नागभीड पोलिसांनी नांदेडच्या दोन व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. या युवकांना विनाअट सोडण्यात यावे, या मागणीसाठी नांदेडवासीयांनी शुक्रवारी नागभीड पोलीस ठाण्यावर हल्लाबोल आंदोलन केले. जवळपास २०० नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. नांदेडवासीयांचे हे आंदोलन नागभीडमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरला.
५ मे रोजी गावकऱ्यांनी मंगेश मारकवार व पुरुषोत्तम बांबोडे या अवैध दारूविक्रेत्यांची दारू पोलिसांना पकडून दिली. दुसऱ्या दिवशी आरोपी सुटून आल्यानंतर दुर्गाबाई मारकवार या आरोपीच्या आईने मनोज विठोबा मेश्राम यांना रस्त्यावर गाठून अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली आणि ७ मे रोजी तळोधी पोलीस चौकीत मनोज विठोबा मेश्राम (३४) आणि हूरन मेहबूब शेख (३५) यांच्या विरोधात विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे नागभीड पोलिसांनी मनोज आणि हुरन विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. मनोज आणि हुरन यांना अटक करण्यात आल्याची माहिती नांदेडच्या गावकऱ्यांना होताच गावात असंतोष निर्माण झाला. सरपंच सत्तार शेख यांच्या नेतृत्वात गावकरी एकत्र आले. मनोज आणि हुरन निर्दोष असून त्यांना करण्यात आलेली अटक बेकायदेशिर आहे, असा ठराव विशेष ग्रामसभेत पारित करून संपूर्ण नागरिक नागभीड पोलीस ठाण्यात धडकले. तपास अधिकाऱ्यांनी कोणतीही मोका तपासणी न करता केलेली कारवाई रद्द करावी, अशी गावकऱ्यांची मागणी होती. दरम्यान अटक करण्यात आलेल्या मनोज आणि हूरन यांना कोर्टात हजर करण्यासाठी पोलीस वाहणाने नेण्याचा प्रयत्नात असताना गावकऱ्यांनी पोलीस वाहणच अडवले. जवळपास तासभर हा मज्जाव सुरू होता. पोलिसांनी बरीच समजूत काढल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना जाऊ दिले. एसडीओ रिना जनबंधू यांनी भेट देऊन चौकशीचे आदेश दिले. (तालुका प्रतिनिधी)