मतदारांच्या अर्जांची फाईल गहाळ

By Admin | Updated: April 4, 2016 01:58 IST2016-04-04T01:58:21+5:302016-04-04T01:58:21+5:30

एकही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी शासन व्यापक प्रमाणात जनजागृती करीत आहे. यासाठी

File of voter applications file missing | मतदारांच्या अर्जांची फाईल गहाळ

मतदारांच्या अर्जांची फाईल गहाळ

चंद्रपूर : एकही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी शासन व्यापक प्रमाणात जनजागृती करीत आहे. यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. असे असताना शासकीय यंत्रणाच या उद्देशाला मूठमाती देत आहे. मतदारांनी मतदान कॉर्डासाठी दिलेल्या अर्जांची फाईलच गहाळ केली जात आहे. हा संतापजनक प्रकार येथील तहसील प्रशासनाकडून घडला आहे. शासकीय यंत्रणेच्या या बेजबाबदारपणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
आपल्या लोकशाही देशात मतदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. हा अधिकार प्रत्येकानेच बजावावा, यासाठी शासनही सर्व स्तरावरून प्रयत्न करीत आहे. कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी कोट्यवधींचा खर्च करून शासन अतिशय व्यापक स्वरुपात जनजागृती करीत आहे. एकीकडे असे चित्र असले तरी दुसरीकडे याच शासनाच्या यंत्रणेमुळे नागरिकांना मतदानापासून वंचित रहावे लागत आहे. याची प्रचितीही नुकतीच आली.
चंद्रपुरात एमईएमल प्रभागातील काही वॉर्डात काही वर्षांपूर्वी पूर आला होता. यात अनेकांची घरे वाहून गेली. नागरिकांचे मतदान कॉर्डही वाहून गेले. अशा नागरिकांसह काही नवीन मतदारांनी आपली नावे मतदार यादीत यावी, यासाठी एमईएल प्रभागातील नगरसेविका वनश्री गेडाम यांची भेट घेतली. वनश्री गेडाम यांनी परिसरातील ५० नागरिकांचे मतदान कॉर्डासाठी अर्ज तयार केले. सर्व अटींची पूर्तता करवून घेतली आणि हे ५० लोकांचे अर्जांची एक फाईल तयार करून मतदान कॉर्डासाठी ती फाईल तहसील प्रशासनाच्या सुपुर्द केली. वनश्री गेडाम यांनी ७ नोव्हेंबर २०१५ रोजी तहसीलदारांच्याच हाती ही फाईल सोपविली आणि मतदान कॉर्ड उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
२३ जानेवारी २०१६ रोजी मतदान कॉर्डाचे वाटप होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र या दिवशी कॉर्डाचे वाटप झालेच नाही. पुढे फेब्रुवारी महिन्यात वनश्री गेडाम यांनी तहसील प्रशासनाकडे जाऊन चौकशी केली. मात्र यावेळी तहसीलदार उपस्थित नसल्याने त्या परत आल्या. मार्च महिन्यामध्येही एक नव्हे तर दोनचारदा नागरिकांसह गेडाम यांनी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजविले. मात्र कुणीही नागरिकांच्या अर्जाची फाईल कुठे आहे, हे सांगू शकले नाही. नागरिकांच्या वारंवार हेलपाट्या मारूनही काम होत नसल्याने अखेर नगरसेविका वनश्री गेडाम यांनी नायब तहसीलदार खांडरे यांची भेट घेतली. त्यांनी सर्व प्रकार खांडरे यांना सांगितला. खांडरे यांनी एका कारकुनाला सोबत घेऊन तहसीलदारांच्या केबीनमध्ये शोधाशोध केली.
मात्र ५० नागरिकांच्या अर्जाची फाईल कुठेही सापडली नाही. एवढेच नव्हे तर प्रकरण प्रोसेसमध्ये असेल म्हणून त्यांनी तहसील कार्यालयातील लिपिक कन्नाके यांच्या माध्यमातून संगणकामध्येही नागरिकांची नावे तपासून बघितली. मात्र तिथेही काही आढळून आले नसल्याची माहिती वनश्री गेडाम यांनी लोकमतशी बोलताना दिली.
याबाबत तहसीलदारांची बऱ्याचदा भेट घेण्याचा प्रयत्न नागरिकांनी व गेडाम यांनी केला. मात्र त्यांची भेट झाली नाही. अखेर गेडाम यांनी भ्रमणध्वनीवरून तहसीलदारांना याबाबत विचारणा केली. मात्र तेदेखील समाधान करू शकले नाही.
मतदार यादीत नाव यावे, मतदान कॉर्ड मिळावे, यासाठी अर्ज केल्यानंतर ते अर्जच संबंधित प्रशासनाकडून गहाळ केले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
उल्लेखनीय बाब अशी की एखाद्या नागरिकांचा अर्ज गहाळ झाला असता तर एकवेळ बाजु समजण्यासारखी असती. मात्र तब्बल ५० नागरिकांचे अर्ज गहाळ होत असल्याने तहसील प्रशासन किती जबाबदारीने काम करतात, हे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)
या नागरिकांचे होते अर्ज
४अंकित आखरे, अर्चना आखरे, प्रणाली पाटील, प्राजक्ता किन्नाके, शितल बन्सोड, प्रतिक सरोदे, कोमलसिंग मस्करे, बानो शेख, ज्योती भगत, संजय मुरस्कर, अल्का मुरस्कर, विलास विधाते, शांता विधाते, प्रफुल्ल पाटकर, धम्मदीप बांबोळे, यशकुमार चौहाण, रिमन साहू, पुरुषोत्तम कटरे, विनोद भगत, चंद्रशेखर बन्सोड, गणेश बिश्वास, अंकुश दमाटे यांच्यासह ५० नागरिकांचे अर्ज तहसील प्रशासनाकडून गहाळ झाल्याचा आरोप वनश्री गेडाम यांनी केला आहे.
नागरिकांचे अर्ज रितसर भरून तहसीलदारांच्या हातात दिले. जानेवारी महिन्यात कॉर्डाचे वाटप होणार होते. मात्र झाले नाही. त्यानंतर आपण याबाबत वारंवार चौकशी केली. नायब तहसीलदारांनी अर्ज शोधले. मात्र ५० नागरिकांचे अर्जच कुठे मिळाले नाही.
-वनश्री गेडाम,
नगरसेविका, एमईएल प्रभाग, चंद्रपूर

Web Title: File of voter applications file missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.