केपीसीएल आणि एम्टावर खटला दाखल करा
By Admin | Updated: October 21, 2015 01:05 IST2015-10-21T01:05:58+5:302015-10-21T01:05:58+5:30
बरांज येथील कर्नाटक एम्टा व पॉवर कंपनीने चंद्रपूर जिल्ह्यात असलेले सहा कोल बेल्ट वर्धा जिल्ह्यात दाखवून शासनाची फसवणूक केली.

केपीसीएल आणि एम्टावर खटला दाखल करा
चंद्रपूरचे कोल ब्लॉक दाखविले वर्धेत : २००९ पासून कर चोरीचा आरोप
चंद्रपूर : बरांज येथील कर्नाटक एम्टा व पॉवर कंपनीने चंद्रपूर जिल्ह्यात असलेले सहा कोल बेल्ट वर्धा जिल्ह्यात दाखवून शासनाची फसवणूक केली. एवढेच नाही तर या बळावर २००९ पासून करचोरी केली, असा आरोप विनोद खोब्रागडे यांनी केला असून कंपनीची चौकशी करून खटला दाखल करण्याची मागणी मंगळवारी एका पत्रकार परिषदेतून केली.
२०११ पासून विनोद खोब्रागडे यांचा या कंपनीच्या अनियमितपणाविरूद्ध लढा सुरू आहे. त्या काळात या क्षेत्रात तलाठी असताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे कंपनीविरूद्ध अहवाल दिला होता. प्रशासन कसलीही कारवाई करीत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. खोब्रागडे म्हणाले, प्रशासनाच्या या भूमिकेविरूद्ध आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. वित्तमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याही निदर्शनास हा प्रकार आणून दिला असता त्यांनी दखल घेण्याचे आश्वासन दिले आहे. २००३ मध्ये केंद्र सरकारने या कंपनीला अटी-शर्तींच्या अधीन राहून कोळसा उत्खनणासाठी मंजुरी दिली होती. मात्र कंपनीने त्यांचे उल्लंघन केल्याने सर्वाेच्च न्यायालयाने २४.९.२०१४ रोजी कंपनीकडील सहाही कोल बेल्ट अवैध ठरविले. आपल्या तक्रारीवरून भद्रावती न्यायालयाने कंपनीवर चोरीचा गुन्हा दाखल केल्याचीही माहिती त्यांनी दिली. भूमी संपादन अधिनियमच्या कलम १६ व १७ नुसार या कंपनीला कोल बेल्टचा प्रत्यक्ष ताबा मिळाल्याचा उल्लेख नसतानाही ही कंपनी खोटे पत्ते देवून हजारोंची करचोरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी उच्च स्तरावर दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)