ब्रह्मपुरी तलावाच्या कामाचा गुन्हा दाखल करा
By Admin | Updated: May 17, 2017 00:43 IST2017-05-17T00:43:19+5:302017-05-17T00:43:19+5:30
येथील कोट तलावाच्या सौदर्यीकरणात कोट्यवधी रूपयांचा घोटाळा करण्यात आल्याने ...

ब्रह्मपुरी तलावाच्या कामाचा गुन्हा दाखल करा
विजय वडेट्टीवार यांची मागणी
ब्रह्मपुरी : येथील कोट तलावाच्या सौदर्यीकरणात कोट्यवधी रूपयांचा घोटाळा करण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे विधिमंडळ उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत शासनाने ब्रम्हपुरी नगरपरिषदतंर्गत असलेल्या कोट तलावाच्या सौदर्यीकरण व पर्यावरण कामाकरिता २ कोटी १२ लक्ष ३१ हजार ७२१ रूपये मंजूर करण्यात आले. या कामाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आॅगस्ट-२०१२ मध्ये तांत्रिक मान्यता दिली. या कामाची निविदा ब्रम्हपुरी नगरपरिषदेने १५ जानेवारी २०१३ रोजी प्रकाशित केली. तर पूजा कंन्स्ट्रक्शन कंपनीशी करारनामा करून कंपनीला काम देण्यात आले. या करारनाम्यामध्ये अंदाजपत्रकानुसार काम करण्यात यावे, असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते. परंतु न झालेली कामे, अर्धवट असलेली कामे आणि नित्कृष्ट दर्जाची झालेली कामे कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवून बनावट मोजमापाच्या आधारे एम.बी.रेकाड करून कोटी ८० लाख रूपयांची उचल करून शासनाची किमान दीड कोटी रूपयांनी फसवणूक केल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमार्फर चौकशी करण्यात यावी. तसेच संबंधित कंत्राटदाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष तथा काँग्रेस विधिमंडळ उपगट नेता आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रधान सचिव नगरविकास, संचालक व आयुक्त नगरप्रशासन, जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.