‘त्या’ नागपंचमीच्या बाऱ्या अन् चिमूरचा क्रांती लढा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:00 PM2019-08-04T23:00:18+5:302019-08-04T23:00:47+5:30

‘गुलामी अब नहीं होना हमारे प्रिय भारत मे, हम आझादी के लिये मर मिटेंगे, हमारे प्रिय भारत मे’ या राष्ट्रसंताच्या क्रांतिकारी भजनाचे बोल प्रत्येकाच्या कानात घुमत होते. अन १६ आॅगस्ट १९४२ चा तो दिवस उजाडला.

Fight the Revolution of 'That' Nagpanchami's Bariya and Chimur ...! | ‘त्या’ नागपंचमीच्या बाऱ्या अन् चिमूरचा क्रांती लढा...!

‘त्या’ नागपंचमीच्या बाऱ्या अन् चिमूरचा क्रांती लढा...!

Next
ठळक मुद्देआठवणींना उजाळा : चिमूरकरांची नागपंचमी झाली होती रक्तरंजित

राजकुमार चुनारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : ‘गुलामी अब नहीं होना हमारे प्रिय भारत मे, हम आझादी के लिये मर मिटेंगे, हमारे प्रिय भारत मे’ या राष्ट्रसंताच्या क्रांतिकारी भजनाचे बोल प्रत्येकाच्या कानात घुमत होते. अन १६ आॅगस्ट १९४२ चा तो दिवस उजाडला. यादिवशी नागपंचमी होती. त्यामुळे घराघरात नागपंचमीच्या बाऱ्या बोलल्या जात होत्या. नागपंचमीच्या बाऱ्या अन क्रांतीच्या ज्वाला यातूनच चिमुरातील क्रांतिकारकांनी इंग्रज राजवटीतील जुलमी अधिकारी एसडीओ डुंगाजी, नायब तहसीलदार सोनवणे व जरासंध यांचा वध केला. यासाठी तीन क्रांतिकारक शहीद झाले होते. त्यामुळे १६ आॅगस्ट १९४२ ची नागपंचमी रक्तरंजीत ठरली होती.
इंग्रजाची जुलमी सत्ता भारतातून उलथवून लावण्यासाठी गांधीजींनी ८ आॅगस्ट १९४२ ला मुंबई येथील ग्वालिया टॅन्क मैदानावर ‘करा अथवा मरा’चा संदेश दिला. या संदेशाने तरुणांना स्फूर्ती दिली. या आदेशाने चिमूर येथील युवक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यांसाठी गुप्त बैठका व प्रभात फेºया काढण्यास १२ आॅगस्ट १९४२ पासून सुरुवात केली. याच परिसरात वास्तव्यास असलेले राष्ट्रसंत गावागावात भजनाच्या माध्यमातून युवकांना स्वातंत्र्याविषयी प्रेरित करीत होते. १६ आॅगस्ट १९४२ ला नागपंचमीचा दिवस असल्याने घराघरात नागदेवतेची पूजा करून बाºया बोलल्या जात होत्या. अशातच सकाळी ९ वाजता गोपाळराव कोरेकार यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व प्रभातफेरी काढण्यात आली. या फेरीत कांग्रेस, सेवादल व संघाचे कार्यकर्ते एकत्र आले. प्रभातफेरी जुना बसस्थानक येथे आली. इंग्रजांविरुध्द घोषणा देत नागमंदिराकडे जात होती. नागपंचमीमुळे शेकडो नागरिक जमा झाले होते. मात्र काही क्रांतिकारकाच्या मनात वेगळेच होते.
‘पत्थर सारे बॉम्ब बनेगे, भक्त बनेगी सेना’ राष्ट्रसंताच्या या भजनाने प्रेरित झालेल्या क्रांतिकारकापैकी सेवादलाचे उद्धवराव खेमस्कर यांनी क्रांतीचा बिगुल फुंकला व सारे कार्यकर्ते अभ्यंकर मैदानावर येऊन ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देऊ लागले. तेवढयात पोलीस दलाने स्वातंत्र्यवीरांच्या हातातील तिरंगा झेंडा हिसकावून घेतला व १२ क्रांतिकारकांना तुरुंगात डांबले.
या घटनेने चिडून क्रांतिकारकांनी आपला मोर्चा इंग्रज अधिकारी डुंगाजी, सोनवाणे व जरासंध यांच्याकडे वळविला व या तिन्ही इंग्रज अधिकारी यांना यमसदनी धाडले. याकरिता अनेक क्रांतिकारकांना लाठीमार खावा लागला तर याच दिवशी १६ वर्षाचा बालाजी रायपूरकर, श्रीराम बिंगेवार व बाबुलाल झिरे यांना १६ आॅगस्ट १९४२ नागपंचमीच्या दिवशी वीरमरण येऊन क्रांतिभूमीसाठी शहीद झाले. त्यामुळे १९४२ ची ती नागपंचमी चिमूरकरासाठी रक्तरंजीत ठरली होती.
पाच फण्यांची नागमूर्ती देते क्रांतीची प्रेरणा
चिमूर येथील क्रांतिवीर व हुतात्म्यांचे स्मरण भावी पिढ्यांना राहावे व त्यांच्या कार्यातून आजच्या युवकांना प्रेरणा मिळावी, याकरिता १६ आॅगस्ट १९५२ ला या स्मारकाचा शिलाण्यास करण्यात आला. हे हुतात्मा स्मारक लांबी, रुंदी व ऊंची १६ बाय १६ फूट असून त्यावर पाच फण्याची नागदेवतेची मूर्ती आहे. त्यावर हुतात्म्यांची नावे कोरलेली आहेत.

Web Title: Fight the Revolution of 'That' Nagpanchami's Bariya and Chimur ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.