पक्षांच्या स्वबळाचा पोलिसांना ताप
By Admin | Updated: September 29, 2014 23:01 IST2014-09-29T23:01:37+5:302014-09-29T23:01:37+5:30
भाजप-शिवसेनेची २५ वर्षाची जुनी युती तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची १५ वर्षाची आघाडी आता तुटली आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला

पक्षांच्या स्वबळाचा पोलिसांना ताप
बंदोबस्ताचे नियोजन कोलमडले : प्रचार रॅली, जाहीर सभा, मिरवणुकांत होणार दमछाक
चंद्रपूर : भाजप-शिवसेनेची २५ वर्षाची जुनी युती तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची १५ वर्षाची आघाडी आता तुटली आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असला तरी, पोलिसांचा ताप मात्र वाढला आहे. कारण निवडणूक बंदोबस्ताचे नियोजनच कोलमडले आहे.
यापूर्वी भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असल्यामुळे एका मतदार संघात युती व आघाडीचे दोनच उमेदवार रिंगणात असायचे. मात्र आता युती व आघाडी तुटल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना या प्रमुख पक्षाचे स्वतंत्र्य उमेदवार रिंगणात राहणार आहेत. तर युती-आघाडी तुटल्याने अनेकांना तिकीट मिळाली नाही. चारही प्रमुख पक्षात बंडखोरी झाली. काहींनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे यावर्षीच्या विधानसभा निवडणूकीत एका क्षेत्रात उमेदवार वाढले आहेत. ज्या मतदार संघात दोन ते तीन उमेदवार मुख्य असायचे तेथे आता चार ते पाच उमेदवार प्रमुख असणार आहेत. त्यामुळे जाहिर सभा व प्रचार रॅलींची संख्याही वाढणार आहेत. या सभा व रॅलींना बंदोबस्त पुरविताना पोलिसांच्या नाकीनऊ येणार आहे.
सर्वत्र दुर्गोत्सवाची धूम सुरु आहे. ठिकठिकाणी रोषणाई करुन दांडीया, गरबा असे कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे या सार्वजनिक कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या निवडणूकीच्या बंदोबस्तासाठी काही दिवसांची वेळ असली तरी दुर्गोत्सव होताच पोलीस कर्मचारी निवडणूक बंदोबस्ताच्या तयारीला लागणार आहे. ईव्हीएम मशीन पोहचविणे व मतदान केंद्रावर सुरक्षा करावी लागणार आहे. मात्र, प्रचाराला सुरुवात झाली असून दोन ते तीन दिवसानंतर प्रमुख पक्षाचे उमेदवार आपआपल्या क्षेत्रात जाहिर सभा घेणार आहेत. तर काही पक्ष सिनेअभिनेत्यांना आणून प्रचार रॅली काढतील, अशावेळी पोलिसांना बंदोबस्त पुरवावे लागणार आहे.
प्रचारासाठी उमेदवारांना १२ दिवसांचा अवधी मिळणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षामध्ये स्टार प्रचारकाच्या सभा होणार आहे. मात्र तालुकास्तरावर उपलब्ध असलेली मैदान, शाळा, महाविद्यालयाच्या पटांगणावर जाहिर सभा होणार असल्याने या मैदानावर सभा घेण्यासाठी परवानगी देतानाही पोलिसांना अडचणी येणार आहेत. दुर्गोत्सव व निवडणूक अशा दोन बंदोबस्तात उमेदवारांची वाढलेली संख्या ही पोलिसांना तापदायक ठरत असून मनुष्यबळ पुरविताना नाकीनऊ येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)