आयुधनिर्माणी इतरत्र हलविण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2015 01:50 IST2015-06-19T01:50:18+5:302015-06-19T01:50:18+5:30

कोळसा खाणीसाठी भद्रावती येथील आयुधनिर्माणी अन्यत्र हलविण्याचा घाट घातला जात आहे.

Ferry jetty | आयुधनिर्माणी इतरत्र हलविण्याचा घाट

आयुधनिर्माणी इतरत्र हलविण्याचा घाट

चंद्रपूर : कोळसा खाणीसाठी भद्रावती येथील आयुधनिर्माणी अन्यत्र हलविण्याचा घाट घातला जात आहे. असे झाल्यास दहा हजार एकरातील जंगलावर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. तसेच ताडोबा अभयारण्यही यामुळे प्रभावित होणार असून जिल्ह्यातील पर्यावरणाचा ऱ्हास होणार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. समृद्ध जंगलामुळे पर्यावरणाला अनुकूल असलेला जिल्हा वाढत्या औद्योगिकरणामुळे प्रतिकूल बनला आहे. प्रदूषणात चंद्रपूर जिल्ह्याने देशभरात अगदी वरचा क्रमांक पटकाविला. जमिनीखाली असणारा दगडी कोळसा जिल्ह्यासाठी शाप बनत चालला आहे. भद्रावती येथील आयुधनिर्माणी प्रकल्प हा तब्बल सतरा हजार एकरात पसरला आहे. त्यापैकी जवळपास नऊ ते दहा हजार एकरात घनदाट जंगल आहे. एवढेच नव्हे, तर वसाहतीचा काही भाग पूर्णपणे जंगलात आहे. या प्रकल्पाच्या परिसरात सर्वसामान्य जनतेला प्रवेश निशिद्ध असल्याने या परिसरातील जंगलाला संरक्षण प्राप्त झाले आहे. माणसांचा कोणताही धोका नसल्यामुळे येथील जंगलात वन्यप्राण्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. हा प्रकल्प जंगली प्राण्यांसाठी एकप्रकारे वरदान ठरला आहे. या जंगलात पट्टेदार वाघ, बिबटे, अस्वली या मोठ्या प्राण्यांसह सर्वच प्रकारचे प्राणी येथे आढळतात. हा परिसर संरक्षित असल्यामुळे येथे कोणत्याही प्रकारची वृक्षतोड होत नाही. त्यामुळे या परिसरातील जंगल घनदाट वाढलेले आहे. जिल्ह्यातील पर्यावरणात ते महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या जंगलाला लागूनच पर्यटकांना आकर्षित करणारे ताडोबा अभयारण्य व अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. अशास्थितीत केवळ कोळसा खाणीसाठी हा प्रकल्प हलविल्यास जवळपास दहा एकरांतील जंगल पूर्णत: नष्ट होणार आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Ferry jetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.